आयओए एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही - किरेन रिजीजू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 03:43 AM2019-06-26T03:43:26+5:302019-06-26T03:43:59+5:30
‘भारतीय आॅलिम्पिक संघटना (आयओए) २०२२ मध्ये होणाऱ्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही,’ असे केंद्रीय क्रीडामंत्री कीरेन रिजीजू यांनी स्पष्ट केले.
नवी दिल्ली : ‘भारतीय आॅलिम्पिक संघटना (आयओए) २०२२ मध्ये होणाऱ्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही,’ असे केंद्रीय क्रीडामंत्री कीरेन रिजीजू यांनी स्पष्ट केले. राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजी हटवल्यानंतर आयओएने या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली.
गेल्या आठवड्यात राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने (सीजीएफ) बर्मिंगहॅम स्पर्धेतून नेमबाजी वगळण्याचा निर्णय घेताना तीन नवीन खेळांचा समावेश करण्याची शिफारस केली होती. हा निर्णय भारतासाठी मोठा धक्का आहे. २०१८ मध्ये गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण ६४ पदके जिंकली होती आणि त्यापैकी १६ पदके नेमबाजांनी जिंकली होती. तथापि, रिजीजू यांनी त्यांचे मंत्रालय कोणताही निर्णय घेण्याआधी नेमबाजी महासंघ आणि आयओएशी विस्तृत चर्चा करेल.
रिजीजू म्हणाले, ‘मी नेमबाजी महासंघाशी चर्चा केलेली नाही. जर बहिष्कार टाकायचा असेल तर तुम्हाला सरकारला विचारावे लागेल. कारण असे निर्णय एकतर्फी घेतले जाऊ शकत नाही. यावर योग्य सल्लामसलतीनंतर योग्य निर्णय घेतला जाईल. हा आमच्या खेळाडूंच्या भविष्याचा आणि राष्ट्रीय प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. यात सर्व काही समाविष्ट आहे. आयओएने काही पावले उचलायला हवीत व आम्ही त्यांच्याशी याविषयी चर्चा करू.’
२०३२ आॅलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदाविषयी रिजीजू म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद पत्करणे हे कोणत्याही देशासाठी प्रतिष्ठेची बाब आहे. आॅलिम्पिक, विश्वचषक अथवा कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्याची सर्वांचीच इच्छा असते. तथापि, तुम्ही त्यासाठी तयार आहात का हा मुख्य प्रश्न आहे. आॅलिम्पिकचे आयोजन करण्यात एक राष्ट्र म्हणून आम्हाला अभिमान वाटेल यात शंकाच नाही. आम्ही सकारात्मक आहोत व आम्ही याबाबत आयओएशी चर्चा करू.’ (वृत्तसंस्था)