कोरोना व्हायरसनंतरही ऑलिम्पिक आयोजनाचा आयओसीचा निर्धार कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 02:09 AM2020-02-29T02:09:58+5:302020-02-29T02:10:07+5:30
आरोग्याच्या दृष्टीने प्रवासास मनाई झाल्यास विचार करावा लागेल- थॉमस बाक
टोकियो : कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढला असला तरीही टोकियोत २०२० ऑलिम्पिक २४ जुलैपासून सुरू करण्याचा निर्धार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी व्यक्त केला आहे. आम्ही आयोजनासाठी पूर्णपणे समर्पित असल्याचे बाक यांचे म्हणणे आहे.
एका वृत्तवाहिनीनुसार बाक यांनी जपानच्या प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. आयओसी ऑलिम्पिक आयोजन यशस्वी करण्यास कटिबद्ध असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. जपान आणि अन्य आशियाई देशात कोरोना व्हायरस झपाट्याने पसरत असल्यामुळे ऑलिम्पिक आयोजनाविषयी वारंवार चिंता व्यक्त केली जात आहे. याच कारणांमुळे अनेक क्रीडा स्पर्धा देखील रद्द करण्यात आल्या. अशावेळी बाक यांनी हा निर्धार व्यक्त केला, हे विशेष.
जपानचे पंतप्रधान शिजो आबे यांनी व्हायरसवर नियंत्रणासाठी राष्ट्रीय पातळीवर जलद उपाययोजनेचे आदेश दिले आहेत. याशिवाय, ‘मोठे आयोजन एकतर रद्द करावेत किंवा पुढे ढकलावेत,’ असेही त्यांनी आयोजकांना आवाहन केले. फुटबॉल सामन्यांसह संगीत सोहळा आणि सुमो स्पर्धांच्या तयारीला यामुळे सर्वाधिक फटका बसला.
बाक यांनी आयओसीचे ज्येष्ठ सदस्य डिक पाऊंड यांच्या वक्तव्यावर थेट प्रतिक्रिया देणे टाळले. मात्र, ‘आरोग्याच्या दृष्टीने प्रवास करण्यास मनाई करण्यात आल्यास स्पर्धा रद्द होऊ शकतात,’ असे संकेत दिले. ‘ऑलिम्पिक रद्द करण्यासंदर्भात आयओसी सदस्यांमध्ये कुठलीही औपचारिक चर्चा झालेली नाही,’ असेही पाऊंड यांनी स्पष्ट केले.
बाक म्हणाले, ‘पात्रता फेरीचे आयोजन व खेळाडूंची सुरक्षा या दोन बाबींनाच प्राधान्य दिले जात आहे. त्यासाठी जपानचे अधिकारी जागतिक आरोग्य संघटना, चीन ऑलिम्पिक समिती यांच्यासह अन्य अनेक राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्यांसोबत आम्ही समन्वय राखत आहोत.’ टोकियो ऑलिम्पिक समितीनेही, कोणत्याही अडथळ्याविना स्पर्धा पार पाडण्याचा विश्वास व्यक्त केला. (वृत्तसंस्था)