वादाच्या भोवऱ्यात आयपीएल...
By Admin | Published: July 15, 2015 01:10 AM2015-07-15T01:10:17+5:302015-07-15T01:10:17+5:30
गुणावान क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळावे यासाठी सुरु करण्यात आलेली इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) स्पर्धा कायमच वादात राहिली आहे. मॅच फिक्सिंग, खेळाडूंचे वर्तन
मुंबई : गुणावान क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळावे यासाठी सुरु करण्यात आलेली इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) स्पर्धा कायमच वादात राहिली आहे. मॅच फिक्सिंग, खेळाडूंचे वर्तन व नियमांचे पालन न केल्याने काही संघांवर करण्यात आलेली कारवाई अशा विविध वादाच्या भोवऱ्यात आयपीएल गटांगळ््या खात असल्याचे चित्र आहे.
भारताला २००७ सालच्या विश्वचषक स्पर्धेत मानहानीकारक पराभवाचे तोंड पहावे लागले होते. त्यानंतर बीसीसीआयने गुणवान खेळाडूंना व्यासपीठ मिळावे व त्याचा फायदा भारतीय क्रिकेटला व्हावा या साठी आयपीएल सुरु कले. अर्थात त्या पूर्वी एस्सेल ग्रुपने नुकतेच इंडियन क्रिकेट लीग सुरु केले होते. मात्र बलाढ्य बीसीसीआयची धन ताकद व प्रभावा समोर ही लीग लवकरच बसनात गुंडाळल्या गेली. आयपीएलला पदार्पणातच मोठी प्रसिद्धी व लोकप्रियता मिळाली. ललित मोदी यांनी आयपीएलची सुरुवात केली. लाखो डॉलरमध्ये ८ संघांची विक्री झाली. त्या वेळी महेंद्रसिंह धोणी हा सर्वांत महागडा खेळाडू ठरला होता. इंडिया सिमेंटची मालकी असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा तो एक भाग झाला. सुरुवातीस एकत्र असलेले मोदी व इंडिया सिमेंटचे तत्कालिन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्यातील दुरावा वाढला. पाठोपाठ दुसऱ्याच वर्षी आयपीएलचे आयोजन वादात सापडले. देशात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे त्या वेळी स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत घेण्यात आली.
पुढील वर्षी स्पर्धा पुन्हा भारतात झाली. मात्र त्या वेळी आर्थिक अनियमिततेमुळे मोदी यांना आयपीएल मधूनच नव्हे तर बीसीसीआयमधून दूर सारण्यात आले. आता अंडर वर्ल्डकडून धोका असल्याने मोदी लंडनमध्ये जाऊन बसले आहेत. सुरुवातीला डेक्कन चार्जर्स संघाची जागा सनरायझर्स हैदराबादने घेतली. केरला टस्कर व सहारा पुणे वॉरियर्स या संघांना आयपीएल नियमांचे पालन न केल्याने बीसीसीआयने त्यांची मान्यता रद्द केली. मैदानाबाहेरील वाद सुरु असताना मैदानातील वादही समोर येत होते. हरभजन सिंग व श्रीसंत यांची ‘थप्पड की गुंज’ चर्चेत राहिली. फिक्सिंग प्रकरणी राजस्थान रॉयल्सच्या तीन खेळाडूंवर बीसीसीआयने आजीवन बंदी घातली. आता तर खुद्द चेन्नई सुपर किंग्जचे मालक गुरुनाथ मयप्पन व राजस्थान रॉयल्सचे राज कुंद्रा यांच्यावर सट्टेबाजीचे आरोप सिद्ध झाल्याने त्यांच्यावर न्यायालयाने आजीवन बंदी घातली आहे. (वृत्तसंस्था)