IPL 10 - गंभीरचे ‘तेवर’ विरुद्ध ‘कुल’ पुणेकर
By admin | Published: May 3, 2017 04:50 PM2017-05-03T16:50:34+5:302017-05-03T16:54:53+5:30
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार गौतम गंभीर हा आपल्या फलंदाजीसोबतच आक्रमकतेसाठीही प्रसिद्ध आहे.
आॅनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 3 - कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार गौतम गंभीर हा आपल्या फलंदाजीसोबतच आक्रमकतेसाठीही प्रसिद्ध आहे. अनेकवेळा मैदानावर गरज असताना देखील तो बचावात्मक धोरण न स्वीकारता आणखीनच आक्रमक होतो. अशा गंभीरच्या संघाचा सामना आहे तो सुपर कुल पुणे संघासोबत. कॅप्टन स्मिथ, कॅप्टन कुल, शांत अजिंक्य रहाणे अशी सुपर खेळाडूंची फौजच रायझिंग पुणे सुपर जायंट्सकडे आहे. आयपीएलच्या दहाव्या सत्रातला केकेआर विरुद्ध आरपीएस हा सामना थोड्याच वेळात कोलकात्यातील ईडन्स गार्डनवर सुरू होणार आहे.
केकेआरचा ख्रिस लीन या सामन्याद्वारे पुनरागमन करू शकतो. त्यामुळे सुनील नरेनचा उपयोग पुन्हा फिरकीपटू म्हणून करता येऊ शकतो. त्याचसोबत संघाची खास बाब म्हणजे गंभीर आणि उथप्पाची जोडी. ही जोडी फोडणे पुणे संघाची आव्हानात्मक असेल. गंभीरने पार्ट टाइम ओपनरचा प्रयोग पुन्हा केल्यास पुणे संघासाठी डोकेदुखी ठरू शकते. ख्रिस लीन किंवा नरेन यांनी दमदार फटकेबाजी करत संघाला सुरुवात करून दिली. तर गंभीर आणि उथप्पा या पायावर मोठी खेळी करण्याची क्षमता बाळगून आहेत. आॅरेंज कॅपच्या यादीत दोघेही अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. केकेआरची गोलंदाजी कुल्टर नाईल, उमेश यादव, डी ग्रॅण्ड होम, व्होक्स यांच्यावर अवलंबून आहेत. त्यांच्या जोडीला नरेन आणि चायनामन कुलदीप यादव आहे.
अजिंक्य रहाणे नेहमीच संघाला चांगली सुरुवात करून देण्यात यशस्वी ठरतो. स्मिथने मुंबई विरोधातील पहिल्या सामन्यात सुंदर फटकेबाजी केली होती. धोनीने मोक्याच्या वेळी संघासाठी धावा केल्या आहेत. तर बेन स्टोक्स याने संघ पराभवाच्या छायेत असताना शतकी खेळी करत संघाला सावरले. पुण्याची गोलंदाजी बहुतांशी इम्रान ताहीर, बेन स्टोक्स यांच्यावर अवलंबून आहे. वॉशिंग्टन सुंदर याला बळी घेता आले नसले तरी धावा रोखण्यात तो यशस्वी ठरतो. शार्दुल ठाकूूरला या स्पर्धेत फारशी छाप पाडता आलेली नाही. त्यांच्या मदतीला ख्रिस्टियनही आहे. कोलकात्याचा संघ त्यांच्या होम ग्राउंडवर फेव्हरेट मानला जात असला तरी त्यांच्यासमोर पुण्याचे कडवे आव्हान आहे.