IPL 10- प्ले आॅफसाठी पंजाबची धडपड
By admin | Published: May 7, 2017 05:35 PM2017-05-07T17:35:30+5:302017-05-07T17:35:30+5:30
आयपीएल १० च्या गुणतक्त्यात किंग्ज इलेव्हन पंजाब पाचव्या स्थानावर आहे.
आॅनलाइन लोकमत
मोहाली, दि. 7 - आयपीएल १० च्या गुणतक्त्यात किंग्ज इलेव्हन पंजाब पाचव्या स्थानावर आहे. पंजाबचा संघ प्ले आॅफसाठी प्रयत्नशील आहे. चौथ्या स्थानावर असलेल्या सनरायजर्स हैदराबादचे १२ सामन्यात १३ गुण असल्याने पंजाबला प्लेआॅफची
संधी आहे. मात्र त्यासाठी त्यांना प्रत्येक सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. थोड्याच वेळात पंजाबचा सामना गुजरात लायन्ससोबत होणार आहे. आयपीएलच्या प्ले आॅफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या गुजरात लायन्स ८ वाजता मोहालीतील स्टेडिअमवर पंजाबसोबत लढणार आहे. होम ग्राउंडवर पंजाबचे पारडे जड असले. तरी या स्पर्धेतील गुजरातच्या फलंदाजांची कामगिरी मॅक्सवेल आणि पंजाबचे गोलंदाज नजरेआड करु शकणार नाही. मॅकक्युलम अपयशी ठरल्यानंतरही रैना आणि कार्तिक यांच्या दमदार खेळीने दिल्ली विरोधात २०९ धावांचा डोंगर उभा करण्यात गुजरातला यश आले होते. मात्र त्याच वेळी हे गुजरातचे गोलंदाज पेलू शकले नाहीत. गुजरातच्या अनुभवहीन आणि सुमार गोलंदाजीचा फटका बसला आणि प्ले आॅफची अखेरची संधीही त्यांच्या हातून निसटली.
या उलट पंजाबची गोलंदाजी मजबूत आहे. संदीप शर्माने मागच्या सामन्यात आरसीबीच्या धुरंधरांना नाचवले होते. त्याने एकाच सामन्यात कोहली, गेल आणि डिव्हिलियर्स यांना बाद करण्याची अफलातून कामगिरी केली होती. आतापर्यंत अशी कामगिरी इतर कोणत्याही गोलंदाजाला जमली नव्हती. त्यामुळेच पंजाबला विजय सोपा झाला होता. अष्टपैलु अक्षर पटेल हा प्रतिस्पर्धी संघासाठी केव्हाही धोकादायक ठरू शकतो. अखेरच्या क्षणी फटकेबाजी करुन तो संघाची धावसंख्या वाढवण्यात नेहमीच यशस्वी झाला आहे. त्यासोबतच अमला, मार्टिन गुप्टील, शॉन मार्श हे संघासाठी मोठी धावसंख्या उभारु शकतात.