IPL 10 - धोनीच्या फटकेबाजीने पुण्याचा हैदराबादवर "सुपर" विजय
By admin | Published: April 22, 2017 04:03 PM2017-04-22T16:03:49+5:302017-04-22T19:45:23+5:30
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात पुणे सुपर जायंटसने सनरायझर्स हैदराबादवर 6 गडी राखून विजय मिळवला.
Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 22 - शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात पुणे सुपर जायंटस संघाने सनरायझर्स हैदराबादवर 6 गडी राखून विजय मिळवला. महेंद्रसिंह धोनी या विजयाचा शिल्पकार ठरला. आयपीएलचा दहावा हंगाम सुरु झाल्यापासून खराब फॉर्मवरुन सातत्याने टीकेचा सामना करणा-या धोनीने आज टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.
शेवटच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावांची गरज असताना धोनीने आपल्या स्टाईलमध्ये चौकार ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केले. हैदराबादने विजयासाठी 177 धावांचे लक्ष्य दिले होते. धोनीने 34 चेंडूत नाबाद (61) धावा फटकावल्या. यात पाच चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. मनोज तिवारी आणि धोनीने 23 चेंडूत नाबाद 58 धावांची भागीदारी करुव विजय खेचून आणला.
अजिंक्य रहाणे अवघ्या दोन धावांवर स्वस्तात माघारी परतल्यानंतर सलामीवीर राहुल त्रिपाठी आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथने डाव सावरला. राहुलने (59) धावांची अर्धशतकी खेळी केली तर, स्मिथने (27) धावा केल्या. पाच सामन्यात अवघे दोन विजय मिळवणा-या पुण्याला स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी आजच्या सामन्यात विजय आवश्यक होता तसेच धोनीचा फॉर्मही संघासाठी चिंतेचा विषय बनला होता. धोनीने आज आपल्या लौकीकाला साजेसा खेळ करत डोळयाचे पारणे फेडणारी फटकेबाजी केली.
हैदराबादकडून डेव्हीड वॉर्नर आणि शिखर धवनने संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली. वॉर्नरने (43) आणि धवनने (30) धावा केल्या. हाणामारीच्या षटकांमध्ये हेनरीक्सने तुफान फटकेबाजी केली. त्याने 28 चेंडूत नाबाद (55 )धावा केल्या. हुडाने (19) धावांवर नाबाद राहून त्याला चांगली साथ दिली. हेनरीक्सने त्याच्या अर्धशतकी खेळीत दोन षटकार आणि सहा चौकार लगावले. हैदराबादने पुण्याच्या शादुर्ल ठाकूरची गोलंदाजी फोडून काढली. शार्दुलच्या चार षटकात 50 धावा वसूल केल्या. त्याला एकही विकेट घेता आला नाही.