आयपीएल ८ संघांसह यशस्वी होईल : शुक्ला
By admin | Published: July 17, 2015 03:31 AM2015-07-17T03:31:38+5:302015-07-17T03:31:38+5:30
वादग्रस्त ठरलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या(आयपीएल) भविष्याची फारशी काळजी करण्याची गरज नाही. दोन संघांवर बंदी आली, तरी आठ संघांसह ही लीग
कोलकता : वादग्रस्त ठरलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या(आयपीएल) भविष्याची फारशी काळजी करण्याची गरज नाही. दोन संघांवर बंदी आली, तरी आठ संघांसह ही लीग कमालीची यशस्वी आणि लोकप्रिय होईल, असा विश्वास आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला यांनी व्यक्त केला.
राजस्थान आणि चेन्नई संघ दोन वर्षांसाठी बाद झाल्याने आयपीएलच्या भविष्याबाबत शुक्लांवर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. यावर ते म्हणाले, की आयपीएल यशस्वी प्रॉडक्ट असल्याने दोन संघांची गच्छंती स्पर्धेचे स्वरूप खराब करू शकत नाही. सहा संघांसह आम्ही स्पर्धा आयोजित करू शकत नाही. पुढील सत्रात किमान आठ संघ असतील. अनेक पर्याय उपलब्ध आहेत, मुंबईत रविवारी आयपीएल संचालन परिषदेची बैठक त्यासाठीच आयोजित करण्यात येत आहे. संचालन परिषदेच्या बैठकीत ज्या बाबींवर विचार होईल, त्यात दोन्ही निलंबित संघ बीसीसीआयच्या अधिकारात काम करू शकतात का, याविषयी चर्चा होईल. यासाठी जबाबदार व्यक्तींची नियुक्ती शक्य आहे.
बीसीसीआयने चेन्नई आणि राजस्थानवर नियंत्रण राखले तरी पदाधिकाऱ्यांच्या दुहेरी भूमिकेबद्दल काय, असा सवाल करताच शुक्ला म्हणाले, की दुटप्पीपणाचा प्रश्नच उद्भवत नाही. आयपीएल बीसीसीआयच्या अखत्यारीत सुरू आहेच. यासाठी दोन मार्ग आहेत. एकतर खेळाडूंचा पारदर्शी लिलाव आणि दुसरा संघांचे व्यवस्थापन! विश्वासपात्र व्यक्तींची व्यवस्थापन पाहण्यासाठी नियुक्ती केली जाईल.
कोची फ्रॅन्चायसीच्या पुनरागमनाबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात शुक्ला म्हणाले, की न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्यावर कायदेशीर मत घेतल्यानंतर अपील करू. चेन्नई आणि राजस्थानवर आजन्म बंदी घातली जाईल का, या प्रश्नाच्या उत्तरात शुक्ला यांनी उत्तर देण्याचे टाळले. (वृत्तसंस्था)