ख्रिस गेलवर आयपीएल बंदी शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2016 03:57 AM2016-05-26T03:57:21+5:302016-05-26T03:57:21+5:30
महिलांबाबत अर्वाच्च शेरेबाजीप्रकरणी टीकेचे लक्ष्य बनलेला वेस्ट इंडीजचा फलंदाज ख्रिस गेल याच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडत आहे. दुर्व्यवहारामुळे ‘बिग बॅश’
नवी दिल्ली : महिलांबाबत अर्वाच्च शेरेबाजीप्रकरणी टीकेचे लक्ष्य बनलेला वेस्ट इंडीजचा फलंदाज
ख्रिस गेल याच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडत आहे. दुर्व्यवहारामुळे ‘बिग बॅश’ स्पर्धेतून बाहेर झालेला हा खेळाडू आता आयपीएलमधूनही बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. त्याच्यावर बंदी घालण्यात येऊ शकते.
आयपीएल आयुक्त राजीव शुक्ला हे गेलबाबत आयपीएल संपताच रॉयल चॅलेंजर्स बॅँंगलोर आणि बीसीसीआयकडे त्याच्या असभ्य वागणुकीची तक्रार करणार असल्याचे वृत्त आहे. बुधवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,‘‘क्रिकेटपटूंनी सभ्य व्यवहार करीत मर्यादेत राहायला हवे. कुणाला आघात होईल किंवा कुणाचा अपमान होईल, असे वर्तन स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी करूच नये. लीगच्या काही मर्यादा आणि नियम आहेत. ते पाळले जावेत. खेळाडू नियमांपेक्षा मोठा नाही. सार्वजनिकरीत्या असभ्यपणा कुणीही स्वीकारणार नाही. याप्रकरणी मी बीसीसीआय अध्यक्ष आणि सचिवांशी चर्चा करणार आहे.’’
बीसीसीआयने अद्याप याप्रकरणी कुठलेली वक्तव्य केले नाही, हे विशेष.
बीसीसीआय सचिव अजय शिर्के
म्हणाले, ‘‘गेल प्रकरण हे दोन विदेशी नागरिकांदरम्यानचे खासगी प्रकरण आहे. पण, याकडे दुर्लक्ष करू, असा याचा अर्थ नाही. कुणी तक्रार केल्यास गेलवर कारवाई केली जाईल.’’
ख्रिस गेल याने एका महिला पत्रकारासोबत
असभ्य भाषेत अश्लाघ्य टिपणी केली. त्याआधी
टेन नेटवर्कची महिला पत्रकार मेल मॅक्लागिनसोबत मुलाखतीदरम्यान असभ्य भाषेत संभाषण
केल्याने गेल अडचणीत आला होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलला टीकेचा सामना करावा लागला होता.