‘आयपीएल’ उत्तम कमाईचे साधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2016 03:13 AM2016-02-23T03:13:21+5:302016-02-23T03:13:21+5:30
युवा खेळाडूंसाठी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धा ही कमाईचे उत्तम साधन आहे. या स्पर्धेच्या ४० दिवसांच्या काळात खेळाडू दहा कोटी रुपयांची कमाई करू शकतो,
नवी दिल्ली : युवा खेळाडूंसाठी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धा ही कमाईचे उत्तम साधन आहे. या स्पर्धेच्या ४० दिवसांच्या काळात खेळाडू दहा कोटी रुपयांची कमाई करू शकतो, अशी प्रतिक्रिया कपिल देव याने दिली.
भारतीय उद्योग व वाणिज्य महासंघ (फिक्की) आयोजित ग्लोबस स्पोर्टस्च्या कार्यक्रमात तो बोलत होता. केंद्रीय क्रीडा सचिव राजीव यादव यावेळी उपस्थित होते.
कपिल म्हणाला, क्रिकेटचा हा पेशा म्हणून चांगला पर्याय आहे. ‘आयपीएल’मुळे कमी कालावधीत खेळाडूंना दहा कोटी रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते. काळ आता बदलत असून, पालक मुलांना आता सांगत आहेत की, तुला अभ्यास करायचा नसेल तर क्रिकेट खेळ.
विविध प्रकारच्या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्या पुढे येत आहेत. माध्यमांनी देखील या खेळांना प्रसिद्धी देत आपली भूमिका बजावली आहे. आता सरकारने खेळांच्या विकासासाठी आवश्यक पावले उचलली पाहिजेत, असेही कपिल देव म्हणाला. देशातील क्रीडा संस्कृतीच्या वाढीसाठी शाळांमधून ठोस प्रयत्न झाले पाहिजेत. शाळाच असे स्थान असते जेथून गुणवत्तेचा विकास होतो. त्यामुळे प्रत्येक शाळेत मैदाने उभारण्यावर व क्रीडा सुविधांवर भर देणे आवश्यक आहे. असे केल्यास देशाच्या क्रीडा संस्कृतीचा पाया मजबूत होईल, असे कपिल याने सांगितले.