आयपीएलच्या चीअरलीडर्स
By Admin | Published: April 8, 2015 03:26 PM2015-04-08T15:26:05+5:302015-04-08T15:26:05+5:30
भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलणा-या आयपीएलमचे सुरुवातीचे पर्व गाजले ते चीअरलीडर्समुळे.
>ऑनलाइन लोकमत
सेलिब्रीटींची मांदियाळी, देशभरातील ख्यातनाम उद्योजक व कलाकारांनी विकत घेतलेले संघ व खेळाडूंवर होणारा पैशांचा पाऊस.. भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलणा-या आयपीएलचे सुरुवातीचे पर्व गाजले ते चीअरलीडर्समुळे. चौकार, षटकार किंवा विकेट गेल्यावर तालबद्ध नाचणा-या चीअरलीडर्सचा हा नजराणा अनेकांना खुपला.
क्रिकेट व चीअरलीडर्स याचा दुरान्वयेही संबंध नसताना आयपीएलमध्ये सीमा रेषेबाहेर थेट चीअरलीडर्स अवतरल्या. छोटे कपडे घालून हातात झिरमिळ्या घेऊन नाचणा-या चीअरलीडर्स या प्रेक्षकांना भावत होत्या. पण दुसरीकडे सच्च्या क्रिकेटप्रेमींना हा प्रकार फारसा रुचला नाही. चीअरलीडर्सचे तंग कपडे व त्यांचे आक्षेपार्ह नृत्य यावर अनेकांनी टीका केली. या चीअर लीडर्स मैदानातील नृत्यापेक्षा सामन्यानंतर होणा-या पार्ट्यांमुळे अधिकच वादग्रस्त ठरल्या. या चीअरलीडर्ससोबत खेळाडूंचे संबंध याविषयीच्या रसरशीत किस्से समोर येत होते. चीअरलीडर्सच्या या प्रतिमेला छेद देण्याचा प्रयत्न केला तो पुणे वॉरियर्सच्या सहारा समुहाने. पुणे वॉरियर्सच्या चिअरलीडर्स या पाश्चिमात्त्य वेशभूषेऐवजी भारतीय पारंपारिक कपड्यांमध्ये अवतरल्या. आयपीएलमधून चीअर लीडर्स बाद करु असे बीसीसीआयने म्हटले होते. पण ही घोषणा हवेतच विरली.