आयपीएल पुन्हा एकदा फिक्सिंगच्या जाळ्यात

By Admin | Published: May 12, 2017 09:46 PM2017-05-12T21:46:46+5:302017-05-12T21:47:43+5:30

विविध वादंगात अडकलेली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फिक्सिंगमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

IPL once again fixing net | आयपीएल पुन्हा एकदा फिक्सिंगच्या जाळ्यात

आयपीएल पुन्हा एकदा फिक्सिंगच्या जाळ्यात

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 
मुंबई/कानपूर / नवी दिल्ली - विविध वादंगात अडकलेली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फिक्सिंगमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कानपूर येथे झालेल्या गुजरात लायन्स विरुध्द दिल्ली डेअरडेव्हिल्स सामन्यादरम्यान कानपूर पोलिसांनी पंचतारांकीत हॉटेलमधून एका माजी क्रिकेटपटूसह तिघांना बेड्या ठोकल्या. धक्कादायक बाब म्हणजे सट्टेबाजांसह दोन क्रिकेटपटूंच्या संपर्कात होता अशी कबुली त्याने कानपुर पोलिसांना दिली आहे. माजी क्रिकेटपटू नयन शाह, ग्रीनपार्क स्टेडीयम कर्मचारी रमेश कुमार आणि एजेंट विकास चौहान अशी अटक आरोपींची नावे आहेत.

मुळचा ठाणे येथील रहिवासी असलेला शाह याने १७ व १९ वर्षांखालील स्पर्धांमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व केले होते. बुधवारी १० मेला झालेल्या गुजरात वि. दिल्ली सामन्यादरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूर पोलिसांनी हॉटेल लँडमार्कच्या १७ व्या मजल्यावरील रुम नंबर १७३३ मध्ये छापा टाकला. तेथून शाहसह कुमार आणि चौहाणच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून पोलिसांनी ४ लाख ७० हजार रुपयांसह पाच मोबाईल आणि विविध रजिस्टर बुक जप्त केले आहेत. या रजिस्टर बुकमधून पोलिसांची हाती महत्त्वाची माहिती लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नयन हा अजमेर येथील बुकी ‘बंटी’ याच्या सतत संपर्कात होता. बंटीच्या सांगण्यावरुन तो हा सट्टेबाजार चालवत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तसेच तो व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून अन्य दोन क्रिकेटपटूंच्याही संपर्कात असल्याची धक्कादायब माहितीही समोर आली आहे. हे दोन क्रिकेटपटू कोण आहे याचे गूढ अद्याप कायम आहे. 

नयनने ग्रीनपार्कच्या खेळपट्टीवर अतिरिक्त पाण्याचा मारा करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. त्यासाठी त्याने ग्रीनपार्क स्टेडीयमचा कर्मचारी असलेल्या कुमारची मदत घेतली. या कारवाईनंतर आफ्रिकेहून आलेला आणि गुजरातमध्ये ठाण मांडून बसलेला बुकी आणि यामागील मास्टरमाईंड बुकी बंटीच्या अटकेसाठी तपास सुरु केला आहे. दोघांना अटक करण्यासाठी विशेष टीम रवाना करण्यात आली आहे. अटक आरोपींकडे मॅच फिक्सिंग बाबतची चौकशीही सुरु करण्यात आली आहे. 


नयन शाहने दिलेल्या माहितीनुसार, नयनने आयपीएल सामन्यांसाठी मोठ्या सट्टेबाजांकडून एक काँट्रॅक्ट घेतले होते. तसेच, खेळपट्ट्यांची माहिती देण्यासाठी सट्टेबाज त्याला दिड लाख रुपये द्यायचे. हे काम तो ग्रीनपार्क स्टेडियमचा कर्मचारी रमेश कुमारच्या मदतीने करायचा. नयनने पुढे अशीही माहिती दिली की, त्याच्या सुचनेनुसार रमेश खेळपट्टीवर अतिरिक्त पाण्याचा मारा करायचा. या कामासाठी नयन रमेशला २० हजार रुपये द्यायचा. दरम्यान, नयनच्या मोबाईलमधून वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीचेही फोटो मिळाले आहेत. 

‘या तिघांवर कारवाई करण्याआधी आम्ही स्थानिक पोलिसांची मदत घेतली. या तिन्ही व्यक्तीच्या प्रत्येक हालचालींवर आम्ही बारिक लक्ष ठेवून होतो. आमच्याकडे तपासणी परवाना नसल्याने कानपूर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली आहे.’ 
- नीरज कुमार, बीसीसीआयचे भ्रष्टाचारविरोधी समितीचे अध्यक्ष आणि दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त 

अशी दिली जायची माहिती..
ग्रीनपार्क स्टेडीयमचा कर्मचारी असलेला रमेश कुमार हा खेळपट्ट्यांचे फोटो आणि स्थिती नयनला पुरवायचा. या माहितीच्याआधारे आयपीएल सामन्यांवर सट्टे लावले जायचे. कानपुरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक आकाश कुल्हारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही आरोपींकडे कसून चौकशी सुरु आहे. तसेच या दिवसांमध्ये आरोपींना हॉटेलमध्ये कोण कोण भेटले याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत घेण्यात येत आहे. ते कोणाच्या संपर्कात होते याचाही अधिक तपास सुरु आहे.

Web Title: IPL once again fixing net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.