आयपीएल पुन्हा एकदा फिक्सिंगच्या जाळ्यात
By admin | Published: May 13, 2017 02:06 AM2017-05-13T02:06:42+5:302017-05-13T02:06:42+5:30
विविध वादंगात अडकलेली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फिक्सिंगमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
मुंबई/कानपूर / नवी दिल्ली : विविध वादंगात अडकलेली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फिक्सिंगमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कानपूर येथे झालेल्या गुजरात लायन्स विरुध्द दिल्ली डेअरडेव्हिल्स सामन्यादरम्यान कानपूर पोलिसांनी पंचतारांकित हॉटेलमधून एका माजी क्रिकेटपटूसह तिघांना बेड्या ठोकल्या. धक्कादायक बाब म्हणजे सट्टेबाजांसह दोन क्रिकेटपटूंच्या संपर्कात होतो, अशी कबुली त्याने कानपूर पोलिसांना दिली आहे. माजी क्रिकेटपटू नयन शाह, ग्रीनपार्क स्टेडियम कर्मचारी रमेशकुमार आणि एजेंट विकास चौहान अशी अटक आरोपींची नावे आहेत.
मूळचा ठाणे येथील रहिवासी असलेला शाह याने १७ व १९ वर्षांखालील स्पर्धांमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व केले होते. बुधवारी १० मे रोजी झालेल्या गुजरात वि. दिल्ली सामन्यादरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूर पोलिसांनी हॉटेल लँडमार्कच्या १७ व्या मजल्यावरील रुम नंबर १७३३ मध्ये छापा टाकला. तेथून शाहसह कुमार आणि चौहानच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून पोलिसांनी ४ लाख ७० हजार रुपयांसह पाच मोबाईल आणि विविध रजिस्टर बुक जप्त केले आहेत. या रजिस्टर बुकमधून पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नयन हा अजमेर येथील बुकी ‘बंटी’ याच्या सतत संपर्कात होता. बंटीच्या सांगण्यावरून तो हा सट्टेबाजार चालवत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तसेच तो व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अन्य दोन क्रिकेटपटूंच्याही संपर्कात असल्याची माहितीही समोर आली आहे. हे दोन क्रिकेटपटू कोण आहेत, याचे गूढ अद्याप कायम आहे.
नयनने ग्रीनपार्कच्या खेळपट्टीवर अतिरिक्त पाण्याचा मारा करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. त्यासाठी त्याने ग्रीनपार्क स्टेडियमचा कर्मचारी असलेल्या कुमारची मदत घेतली. या कारवाईनंतर आफ्रिकेहून आलेला आणि गुजरातमध्ये ठाण मांडून बसलेला बुकी आणि यामागील मास्टरमार्इंड बुकी बंटीच्या अटकेसाठी तपास सुरु केला आहे. दोघांना अटक करण्यासाठी विशेष टीम रवाना करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)
नयन शाहने दिलेल्या माहितीनुसार, नयनने आयपीएल सामन्यांसाठी मोठ्या सट्टेबाजांकडून एक काँट्रॅक्ट घेतले होते. तसेच, खेळपट्ट्यांची माहिती देण्यासाठी सट्टेबाज त्याला दीड लाख रुपये द्यायचे. हे काम तो ग्रीनपार्क स्टेडियमचा कर्मचारी रमेशकुमारच्या मदतीने करायचा. नयनने पुढे अशीही माहिती दिली की, त्याच्या सूचनेनुसार रमेश खेळपट्टीवर अतिरिक्त पाण्याचा मारा करायचा. या कामासाठी नयन रमेशला २० हजार रुपये द्यायचा. दरम्यान, नयनच्या मोबाईलमधून वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीचेही फोटो मिळाले आहेत.
अशी दिली जायची माहिती...-
ग्रीनपार्क स्टेडियमचा कर्मचारी असलेला रमेशकुमार हा खेळपट्ट्यांचे फोटो आणि स्थिती नयनला पुरवायचा. या माहितीच्या आधारे आयपीएल सामन्यांवर सट्टे लावले जायचे. कानपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आकाश कुल्हारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही आरोपींकडे कसून चौकशी सुरु आहे. तसेच या दिवसांमध्ये आरोपींना हॉटेलमध्ये कोण कोण भेटले, याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत घेण्यात येत आहे. ते कोणाच्या संपर्कात होते, याचाही अधिक तपास सुरु आहे.