‘आयपीएल खेळाडूंना विंडीज संघात स्थान नको’
By admin | Published: May 23, 2015 01:14 AM2015-05-23T01:14:15+5:302015-05-23T01:14:15+5:30
आयपीएलमध्ये खेळणाऱ्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना देशाच्या राष्ट्रीय संघात स्थान देऊ नये, असे मत विंडीजचा महान खेळाडू कर्टली अॅम्ब्रोस याने व्यक्त केले आहे.
लंडन : आयपीएलमध्ये खेळणाऱ्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना देशाच्या राष्ट्रीय संघात स्थान देऊ नये, असे मत विंडीजचा महान खेळाडू कर्टली अॅम्ब्रोस याने व्यक्त केले आहे. ‘टाईम टू टॉक’ या स्वत:च्या आत्मकथेच्या प्रचारासाठी लॉर्ड्सवर इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीला उपस्थित राहण्यासाठी आलेला अॅम्ब्रोस म्हणाला, ‘माझ्या मते आयपीएल खेळणाऱ्या विंडीजच्या खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान देऊ नये. मी आयपीएल खेळणाऱ्यांचा अपमान करू इच्छित नाही, पण तुम्ही केवळ आयपीएल खेळून देशाच्या राष्ट्रीय संघात हमखास स्थान निश्चित करू शकत नाही.
‘माझ्यामते हा चिंतेचा विषय आहे.’ अॅम्ब्रोसला वर्षभरापूर्वी तत्कालीन कोच ओटिस गिब्सन यांनी संघाचा गोलंदाजी कोच बनविले होते. नंतर मार्चमध्ये मुख्य कोच बनलेल्या फिल सिमन्स याने देखील अॅम्ब्रोसला कायम ठेवले. कॅरेबियन संघ लवकरच आॅस्ट्रेलियाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. सिमन्सने काल एका वक्तव्यात ड्वेन ब्राव्हो, ख्रिस गेल, कीरोन पोलार्ड, सुनील नरेन, आंद्रे रसेल आणि लेंडल सिमन्स यांना संघाबाहेर ठेवण्याची ही वेळ नाही, असे म्हटले होते. हे सर्वजण आयपीएल-८ मध्ये खेळत आहेत. गेलने कंबरेच्या दुखण्याचे कारण पुढे करीत इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून स्वत:ला दूर ठेवले होते. ब्राव्हो आणि सिमन्स यांनी कसोटी क्रिकेटला अलविदा केले आहे. पोलार्डने प्रथमश्रेणी क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी निवृत्ती घेतली. रसेलने कसोटीसाठी मी शारीरिकदृष्ट्या फिट नाही, अशी घोषणा करून टाकली. नरेनच्या गोलंदाजीची शैली सदोष ठरविली आहे. (वृत्तसंस्था)
सर्वोत्कृष्ट संघ दौऱ्यावर पाठवायचा आहे. दुर्दैवाने आमचे दिग्गज खेळाडू आयपीएलसाठी बाहेर आहेत. आयपीएल खेळायचे की देशासाठी खेळायचे, हे या खेळाडूंना निश्चित करावे लागेल.
- कर्टली अॅम्ब्रोस