IPL: पुण्याचे मालक म्हणतात, स्मिथ धोनीपेक्षा पुढचा विचार करतो
By admin | Published: May 21, 2017 07:46 AM2017-05-21T07:46:21+5:302017-05-21T12:48:34+5:30
आयपीएलच्या रणांगणात आज मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातील दोन संघांची जेतेपदासाठी झुंज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - आयपीएलच्या रणांगणात आज मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातील दोन संघांची जेतेपदासाठी झुंज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आयपीएलचं केवळ दुसरं सत्र खेळणा-या पुणे संघाने अंतिम फेरीत धडक मारून सर्वांनाच धक्का दिला. पण दुसरीकडे पुणे संघाचे मालक संघातील दोन दिग्गज खेळाडूंची तुलना करून वादाला तोंड फोडायचं काम करत आहेत. रायझिंग पुणे सुपरजायंट फ्रेंचायजीचे मालक संजीव गोयंका यांनी हिंदुस्थान टाइम्ससोबत बोलताना स्टिव्ह स्मिथ हा महेंद्रसिंग धोनीच्या एक पाऊल पुढचा विचार करतो असं म्हटलं आहे. यापुर्वी संजीव गोयंका यांचे भाऊ हर्ष गोयंका यांनी धोनीविरोधी ट्विट केले होते, त्यानंतर त्यांच्यावर टीकेचा भडीमार झाला होता.
हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत गोयंका म्हणाले, धोनी हा खूप डोकेबाज खेळाडू आहे, पण स्टीव्ह स्मीथ त्याच्या एक पाऊल पुढे आहे. आतापर्यंत मी ज्यांच्याशी बोललो त्यामध्ये धोनी सर्वात डोकेबाज खेळाडू आहे. तसेच तो जगातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकही आहे. मात्र, स्मिथ त्याच्या एक पाऊल पुढे आहे. ही चॅम्पियनशीप जिंकायची असं मी स्मिथला सांगितलं होतं आणि निकाल तुमच्यासमोर आहे असं ते म्हणाले. काही फलंदाजांना बाद करण्यासाठी स्मिथने जी रणनीती आखली त्यावर विश्वास ठेवता येणं कठीण आहे. ज्याप्रकारे कठीण परिस्थितीचा त्याने सामना केला, खेळाडूंमध्ये विजयाचा विश्वास निर्माण केला त्यामुळे सर्व टीम एकजूट झाली. एकदा स्ट्रॅटेजिक टाइमदरम्यान स्मिथ फलंदाजाजवळ गेला आणि 12 चेंडूत 30 धावा काढा नाही तर आऊट व्हा असं त्याने फलंदाजाला सांगितलं. सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये आमची कामगिरी खराब होती कारण स्मिथ पोटदुखीमुळे खेळू शकला नव्हता असं गोयंका म्हणाले.
गोयंकांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियावरून टीका होत आहे. दरम्यान आज जेतेपदासाठी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये मुंबई आणि पुणे हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत.
आजचे संघ:
रायझिंग पुणे सुपरजायंट-
स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), राहुल त्रिपाठी, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक), मनोज तिवारी, रजत भाटिया, लॉकी फग्र्युसन, डॅन ख्रिस्तियन, शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकट, दीपक चहर, राहुल चहर, अॅडम झम्पा, अंकुश बेन्स, अंकित शर्मा, बाबा अपराजित, अशोक दिंडा, मयांक अगरवाल, जसकरण सिंग, ईश्वर पांडे, मिलिंद टंडन.
मुंबई इंडियन्स-
रोहित शर्मा (कर्णधार), लेंडल सिमन्स, पार्थिव पटेल (यष्टिरक्षक), किरॉन पोलार्ड, अंबाती रायुडू, कृणाल पंडय़ा, हार्दिक पंडय़ा, कर्ण शर्मा, मिचेल मॅक्क्लिनॅघन, लसिथ मलिंगा, मिचेल जॉन्सन, नितीश राणा, जसप्रीत बुमराह, सौरभ तिवारी, आर. विनय कुमार, टिम साऊदी, जीतेश शर्मा, कृष्णप्पा गोथम, श्रेयस गोपाळ, कुलवंत खेजरोलिया.