आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण - मुद्गल समितीचा अहवाल सादर
By admin | Published: November 3, 2014 06:05 PM2014-11-03T18:05:18+5:302014-11-03T18:09:13+5:30
जस्टिस मुकुल मुद्गल यांच्या नेतृत्वाखालील समितीने आयपीएल स्पॉट-फिक्सिंग व सट्टेबाजीप्रकरणी अंतिम अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेदरम्यान झालेले स्पॉट-फिक्सिंग व सट्टेबाजीबाबतचा अंतिम अहवाल जस्टिस मुकुल मुद्गल यांच्या नेतृत्वाखालील समितीने सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सादर केला. आयपीएलच्या सहाव्या पर्वात ( साल २०१३) घडलेल्या या स्पॉट फिक्सिंगचा मुद्गल समितीने तपास केला असून एका बंद लिफाफ्यातील हा अहवाल आज न्यायालयात सादर करण्यात आला.
याप्रकरणी एस. श्रीसंथ, अजित चंडेला आणि अंकित चव्हाण या खेळाडूंसह बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मयप्पन आणि बॉलिवूड अभिनेता विंदू दारा सिंह यांना अटक करण्यात आली होती. मात्र सध्या ते सर्व जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणातील गुरूनाथ मयप्पन याच्यावरील आरोपांमुळे श्रीनिवास यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले होते, मात्र असे असले तरीही आयसीसीच्या ( इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिल) प्रमुखपदी ते अद्याप कायम आहेत.
या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी जस्टिस मुद्गल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एल. नागेश्वर राव, वकील निलय दत्ता, पोलीस उप महासंचालक (अमली पदार्थ नियंत्रण विभाग) बीबी मिश्रा आणि भारताचा माजी कप्तान सौरव गांगुली यांचा या समितीत समावेश आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी १० नोव्हेंबर रोजी होणार आहे.