आयपीएलसाठी संघात शुक्रवारी परतणार
By admin | Published: May 13, 2015 11:17 PM2015-05-13T23:17:43+5:302015-05-13T23:17:43+5:30
इंग्लंड संघात पुनरागमनाची आशा मावळल्यानंतर आक्रमक फलंदाज केविन पीटरसन याने आयपीएल-८ च्या प्ले आॅफ दौडीआधी हैैदराबाद सनरायझर्समध्ये परतण्याची तयारी चालविली आहे.
लंडन : इंग्लंड संघात पुनरागमनाची आशा मावळल्यानंतर आक्रमक फलंदाज केविन पीटरसन याने आयपीएल-८ च्या प्ले आॅफ दौडीआधी हैैदराबाद सनरायझर्समध्ये परतण्याची तयारी चालविली आहे.
अॅशेस मालिकेआधी इंग्लंड संघात स्थान मिळेल, अशी पीटरसनला आशा होती. कौंटी क्रिकेटमध्ये सरेकडून खेळताना लिसेस्टरशायरविरुद्ध तिहेरी शतक ठोकल्यानंतर केविन अधिकच आशावादी होता; पण ईसीबीचे नवे संचालक अॅण्ड्र्यू स्ट्रॉस यांनी ‘अविश्वासू खेळाडू’ असे संबोधून पीटरसनच्या परतण्याचा मार्ग बंद केला. ईसीबीची सृूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत स्ट्रॉस यांनी पीटरसनच्या पुनरागमनाचे सर्व मार्ग बंद झाल्याचे सांगितले. आम्ही त्याच्यावर कुठलीही बंदी घातलेली नाही; मात्र तो संघात परतेलच, याची खात्री देऊ शकत नाही, असेही त्यांनी बजावले.
दुसरीकडे, पीटरसननेदेखील ईसीबीवर तोंडसुख घेतले. तो म्हणाला, ‘‘माझ्यासोबत विश्वासघात झाला आहे. संघात पुनरागमनाची संधी असल्याचे सांगून माझी दिशाभूल करण्यात आली. मी कौंटी क्रिकेट खेळण्यासाठी आयपीएलच्या कराराकडे दुर्लक्ष केले. सरेकडे मला देण्यासाठी पैसे नव्हते, तरीही मी त्यांच्या संघाकडून खेळलो. मला संधी मिळणार नाही, याची कल्पना आली होती.’’ बंगळुरूत झालेल्या लिलावाच्या वेळी सनरायझर्स दोन कोटी देणार होते; पण कौंटी खेळण्यासाठी त्या वेळी सरेला प्राधान्य दिले. आता पुन्हा सनरायझर्सकडून खेळू इच्छितो.
आयपीएल करारानुसार खेळाडूंना रिलीज करण्याच्या समझोत्याअंतर्गत स्पर्धेसाठी मला परत बोलावण्याचा सनरायझर्सला अधिकार आहे. सनरायझर्स प्ले आॅफमध्ये स्थान मिळविण्याच्या स्थितीत आहे. संघ व्यवस्थापनाने पीटरसनच्या पुनरागमनाबद्दल कुठलाही शब्द दिलेला नाही; पण डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी पीटरसन फारच उत्सुक आहे, याबद्दल शंका नाही. (वृत्तसंस्था)