आयपीएल म्हणजे विश्व क्रिकेटचे विद्यापीठ!
By admin | Published: April 30, 2016 05:46 AM2016-04-30T05:46:53+5:302016-04-30T06:29:15+5:30
इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) विश्व क्रिकेटचे विद्यापीठ ठरले आहे.
एबी डिव्हिलीयर्स लिहितो...
इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) विश्व क्रिकेटचे विद्यापीठ ठरले आहे. आयपीएलबाबत चर्चा करताना लोक खेळाडूंना मिळणारे मानधन आणि त्यांना मिळणारी ओळख यावर लक्ष देतात. या दोन्ही बाबींचा विचार करता आयपीएलने क्रिकेटला वेगळी उंची गाठून दिली आहे. यापूर्वी कधीच घडले नाही, अशा पद्धतीने या लीगने क्रिकेटला सादर केले आहे. या स्पर्धेनिमित्ताने खेळाडूंना विश्वस्तरावर ओळख निर्माण करून देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. दरम्यान, आयपीएलचा आमच्या खेळावर पडलेला प्रभाव, याबाबत अधिक कुणी चर्चा करीत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, पण याची साधी चर्चाही होत नाही. दोन महिने रंगणाऱ्या या लीगच्या निमित्ताने जगभरातील खेळाडू आपला अनुभव शेअर करतात, याची चर्चा होणे गरजेचे आहे. मी वर्षभरातील ४४ आठवड्यांच्या तुलनेत आयपीएलच्या एका मोसमात अनेक नव्या बाबी आत्मसात करतो.
प्रत्येक दिवस, प्रत्येक सामना, विश्वदर्जाच्या खेळाडूंच्या सान्निध्यात वावरण्याचा अनुभव, त्यांच्यासोबत चर्चा, ते तयारी कशी करतात, हे बघण्याची संधी या सर्व बाबींतून बरेच काही शिकता येते. कुठल्याही खेळाडूला शिकण्याकरिता यापेक्षा चांगले स्थान नाही. आयपीएल खेळणे म्हणजे एमबीए केल्याप्रमाणे आहे.
प्रत्येक ठिकाणी सर्वोत्तम तयारी अनुभवायला मिळते. वॉर्मअप करताना गोलंदाज व फलंदाज कसे स्वत:ला सामन्यासाठी सज्ज करतात, याचा अनुभव घेता येतो. सामन्याची सुरुवात, मध्य आणि अखेर क्षेत्ररक्षण कसे सजवले जाते, टी-२० क्रिकेटसाठी नवी रणनीती आणि व्यूहरचना तयार करणे, याचे ज्ञान या स्पर्धेतून मिळते. सातत्याने होणाऱ्या प्रवासासोबत ताळमेळ साधणे, खेळाडूंची मीडियांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची पद्धत आणि त्याचसोबत चाहत्यांसोबत वेळ घालविणे आणि फोटो शूट व व्यावसायिक जाहिरात करण्याचे ज्ञान, हे सर्वकाही या एका स्पर्धेच्या निमित्ताने शिकण्याची संधी मिळते. आम्ही वेगवेगळ्या देशांतून आणि वेगवेगळ्या संस्कृतींतून येतो आणि वेगवेगळ्या पंरपरा पाळतो; पण आम्ही सर्व एकच खेळ खेळतो. कुणालाच सर्वकाही कळत नाही, याची आम्हाला चांगली कल्पना आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक खेळाडू, प्रत्येक दिवशी काहीतरी नवे शिकत असतो आणि आपल्या खेळात सुधारणा घडवत असतो. वैयक्तिक विचार केला तर आयपीएलच्या नऊ पर्वांचा किती आनंद घेतला हे मला सांगता येणार नाही. या स्पर्धेदरम्यान मला ग्लेन मॅकग्रा, अॅडम गिलख्रिस्ट, स्टिफन फ्लेमिंग, झहीर खान आणि विराट कोहली यांच्यासारख्या खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मी त्यांना चमकदार कामगिरी करताना बघितले आहे. सामन्यानंतर त्यांच्यासोबत वेळ घालवला आणि खेळाबाबत चर्चाही केली. वैयक्तिक जीवनाबाबतही चर्चा केली आणि आपले अनुभवही शेअर केले. आयपीएलमुळे केवळ खेळाडू म्हणूनच नाही, तर एक व्यक्ती म्हणूनही
स्वत:मध्ये सुधारणा घडविण्यास मदत मिळाली. (टीसीएम)