IPL10 - मोहम्मद सिराज: 500 रुपये ते 2.3 कोटी!
By Admin | Published: February 20, 2017 09:21 PM2017-02-20T21:21:27+5:302017-02-20T21:34:07+5:30
तो पहिला सामना खेळला तेव्हा २० धावा देत नऊ गडी बाद केल्यामुळे मामाने त्याला ५०० रुपये बक्षीस दिले.
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 20 - तो पहिला सामना खेळला तेव्हा २० धावा देत नऊ गडी बाद केल्यामुळे मामाने त्याला ५०० रुपये बक्षीस दिले. क्रिकेटचा हा पहिला पुरस्कार होता. पण आज आयपीएलच्या दहाव्या पर्वात २.६ कोटी रुपयांचा भाव मिळताच हा खेळाडू स्तब्ध झाला. थोड्या वेळासाठी त्याला हे स्वप्न वाटले. स्वत:ला सावरल्यानंतर मेहनतीचे चीज झाल्याची जाणीव त्याला झाली. मोहम्मद सिराज या खेळाडूचे नाव!
वडील मोहम्मद गौस आणि आई शबाना बेगम यांच्यासाठी पॉश एरियात घर विकत घेण्याचे सिराजचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. सिराज वेगवान मारा करतो. या वेगवान गोलंदाजाला स्थानिक सनराइजर्स हैदराबादने २.६ कोटी खर्च करून लिलावात खरेदी केले. सिराजला भारत अ आणि शेष भारत संघाकडूनही खेळण्याची संधी मिळाली आहे.
आनंदात न्हावून निघालेला सिराज म्हणाला,'क्रिकेटमधील पहिली कमाई मी क्लब सामन्यात केली. माझे मामा संघाचे कर्णधार होते. २५ षटकांच्या त्या सामन्यात मी २० षटकांत प्रतिस्पर्धी संघाचे नऊ फलंदाज बाद केले. मामाने मला ५०० रुपये बक्षीस देताच अतिशय आनंद झाला होता. आज लिलावात मिळालेला भाव पाहून माझे डोळे विस्फारले. माझ्या वालिद साहेबांनी(वडील)फार संघर्ष
केला आहे. ते आॅटोचालक आहेत पण कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीचा परिणाम त्यांनी माझ्यावर आणि माझ्या भावावर होऊ दिला नाही. गोलंदाजीसाठी स्पाईक विकत घ्यायचे तरी मोठी किंमत मोजावी लागते. वडील मात्र माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट स्पाईक आणायचे. आम्ही हालाखीच्या स्थितीत साधारण वस्तीत राहून मोठे झालो. मी कुटुंबासाठी उच्चभ्रू वस्तीत घर खरेदी करू इच्छितो. स्वप्नपूर्तीचा क्षण जवळ आला आहे''.