आयपीएस अधिकारी डॉ. रविंदरकुमार सिंगल यांनी पटकावला 'आयर्नमॅन' किताब
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 02:40 PM2018-09-06T14:40:58+5:302018-09-06T14:41:45+5:30
फ्रान्समधील विची शहरात नुकत्याच पार पाडलेल्या आयर्नमॅन शर्यतीत नाशिक शहर पोलीस आयुक्त डॉ.रविंदर कुमार सिंगल यांनी आयर्न मॅन हा किताब पटकावला.
मुंबई - फ्रान्समधील विची शहरात नुकत्याच पार पाडलेल्या आयर्नमॅन शर्यतीत नाशिक शहर पोलीस आयुक्त डॉ.रविंदर कुमार सिंगल यांनी आयर्न मॅन हा किताब पटकावला. आंतरराष्ट्रीय पातळीवर 'आयर्नमॅन' ही ट्रायथ्लॉन स्पर्धा पूर्ण करणारे ते भारतातले केवळ दुसरे प्रशासकीय अधिकारी ठरले आहेत. ५० वर्षावरील गटात असा पराक्रम करणारे ते पहिले आयपीएस ठरले आहेत.
WTC म्हणजेच वर्ल्ड ट्रायथलॉन कॉर्पोरेशन यांच्यातर्फे आयर्नमॅन ट्रायथ्लॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यामध्ये धे ३.८६ किलोमीटर पोहणे, १८०.२५ किमी. सायकलिंग आणि ४२.२० किमी. धावणे अशा अडथळ्यांवर मात करावी लागते. या स्पर्धेचा कालावधी हा केवळ १६ तासांचा असल्याने ही स्पर्धा अजूनच कठीण आणि चुरशीची होती. डॉ.सिंगल यांनी पोहण्यात १ तास ५० मिनिटे आणि १७ सेकंद, सायकलिंगमध्ये ७ तास १२ मिनिटे आणि धावण्यात ५ तास ४५ मिनिटे आणि ५७ सेकंदाचा वेळ घेतला. त्यांनी ही संपूर्ण स्पर्धा १५ तास १३ मिनिटे वेळात पूर्ण करून 'आयर्नमॅन' हा किताब पटकावला.