ENG vs IRN, FIFA World Cup 2022: ईराणच्या फुटबॉल संघाने मॅचआधी नाही गायलं राष्ट्रगीत, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 08:22 PM2022-11-21T20:22:17+5:302022-11-21T20:24:37+5:30
सामन्यापूर्वी असा प्रकार पाहायला मिळाला जो सहसा पाहायला मिळत नाही
England vs Iran Controversy: FIFA World Cup 2022 सध्या कतारमध्ये खेळला जात आहे. या विश्वचषकात सोमवारी इंग्लंड आणि इराणचे संघ आमनेसामने आले. हा सामना खलिफा इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जात आहे आणि दोन्ही संघांचा हा सलामीचा सामना आहे. मात्र, या सामन्यापूर्वी असा प्रकार पाहायला मिळाला जो सहसा पाहायला मिळत नाही. सामन्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू असताना इराण संघाच्या खेळाडूंनी मौन पाळले. संघातील खेळाडूंनी राष्ट्रगीत गायलेच नाही.
🇮🇷#IRN#FIFAWorldCup | #Qatar2022pic.twitter.com/h7ItdBSDke
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) November 21, 2022
कोणताही सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघ मैदानावर एकत्र येतात आणि त्यानंतर दोन्ही संघांचे राष्ट्रगीत एक-एक करून वाजवले जाते. मात्र या सामन्यात इराणचे राष्ट्रगीत वाजले तेव्हा संघातील खेळाडू शांत राहिले. त्यांनी पूर्णपणे मौन पाळले. या दरम्यान इराणचे चाहतेही स्टँड्समध्ये व स्टेडियममध्ये होते आणि त्यांनी आपल्या संघाच्या खेळाडूंच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली. पण खेळाडूंनी असं का केलं, त्यामागचे कारण आपण जाणून घेऊया.
#IRN fans before kick-off: pic.twitter.com/m8Ltog7B2V
— EuroFoot (@eurofootcom) November 21, 2022
खेळाडू असं का वागले?
दोन महिन्यांपूर्वी इराणमध्ये एका तरुणीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला आणि तेव्हापासून देशभरात आंदोलन सुरू आहे. इराणच्या सरकारी टीव्हीने या सामन्याच्या थेट प्रक्षेपणादरम्यान खेळाडूंच्या लाइनअपचे फुटेज सेन्सॉर केले, त्यामुळे संघाला घरातूनच पाठिंबा मिळत नसल्याचे दिसले. देशाचा फुटबॉल संघ हा इराणसाठी अभिमानाचा विषय आहे. संघातील खेळाडू या मोठ्या फुटबॉल स्पर्धेचा उपयोग आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी करतील का, याकडे विश्वचषकापूर्वी अनेकांचे लक्ष होते. अपेक्षेनुसार सामन्यापूर्वी कर्णधार एहसान हजसाफीने आंदोलन करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभे असल्याचे स्पष्ट केले होते. "आम्ही अन्यायाविरोधात होत असलेल्या आंदोलकांच्या सोबत आहोत. आम्ही त्यांना पाठिंबा देतो. आम्हाला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे," असे तो आधीच म्हणाला होता. त्यामुळे खेळाडूंनी आपला संताप अशा प्रकारे व्यक्त केला.