आयर्लंडचा बांगलादेशावर ‘दमदार’ विजय
By admin | Published: February 13, 2015 12:38 AM2015-02-13T00:38:18+5:302015-02-13T00:38:18+5:30
अॅण्डी बालबिर्नीच्या नाबाद ६३ धावा आणि त्याआधी गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून कामगिरीच्या बळावर आयर्लंडने सराव सामन्यात गुरुवारी बांगलादेशला
सिडनी : अॅण्डी बालबिर्नीच्या नाबाद ६३ धावा आणि त्याआधी गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून कामगिरीच्या बळावर आयर्लंडने सराव सामन्यात गुरुवारी बांगलादेशला चार गड्यांनी धूळ चारून ‘दम’ दाखविला. विश्वचषकात आम्ही कुणालाही पराभूत करू शकतो, हा संदेश विजयाद्वारे दिला.
आयर्लंडने नाणेफेक जिंकून बांगलादेशला फलंदाजी दिली. बांगला देश ४८.२ षटकांत १८९ धावांत गारद झाला. विजयाचा पाठलाग करणाऱ्या आयर्लंडने ४६.५ षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात १९० धावा करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. एड ज्योएसने ४७ धावांचे योगदान दिले. बांगलादेशकडून ताझिल उल इस्लामयाने दोन; तसेच अल अमीन, तस्किन अहमद व नासिर हुसेन यांनी एकेक गडी बाद केला.
आयर्लंडच्या गोलंदाजांनी अविश्वसनीय कामगिरी केली. जॉन मूनी याने दहा षटकांत ३२ धावांत तीन आणि मॅक्स सोरेनसेन याने ३१ धावांत तीन गडी बाद केले. बांगला देशकडून सोमय्या सरकारने ४५, अनामूल हक २५, मुशफिकर रहीम २६, शब्बीर रहमान २० आणि कर्णधार मुशर्रफ मूर्तझाने २२ धावा केल्या. शनिवारपासून (दि. १४) सुरू होत असलेल्या विश्वचषकात सोमवारी आयर्लंड-विंडीज आणि बुधवारी बांगलादेश-अफगाण सामना खेळला जाईल. (वृत्तसंस्था)