इरफान पठाणचं आयपीएलमध्ये पुनरागन
By Admin | Published: April 25, 2017 10:44 AM2017-04-25T10:44:41+5:302017-04-25T10:44:41+5:30
ड्वेन ब्राव्हो जखमी झाल्याने त्याने आयपीएलमधून माघार घेतली असून त्याच्या जागी इरफान पठाणची वर्णी लागली आहे
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - गुजरात लायन्सने ऑल राऊंडर इरफान पठाणला खरेदी केलं आहे. ड्वेन ब्राव्हो जखमी झाल्याने त्याने आयपीएलमधून माघार घेतली असून त्याच्या जागी इरफान पठाणची वर्णी लागली आहे. आयपीएलच्या दहाव्या मोसमाच्या लिलावात 50 लाख किंमत असणा-या इरफानला खरेदी करण्यात कोणत्याच संघाने रस दाखवला नव्हता. ड्वेन ब्राव्होला झालेल्या दुखापतीमुळे इरफानची भावनिक जखम मात्र भरुन निघाली आहे. इरफानने गुजरात लायन्सची जर्सी घातलेला फोटो ट्विटरवर शेअर केला असून सहभागी होण्यास उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.
32 वर्षीय इरफान पठाण आतापर्यंत पाच आयपीएल संघांमधून खेळला आहे. यामध्ये चेन्नई सुपरकिंग्ज, दिल्ली डेअरडेव्हिल्स, किंग्स इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद आणि रायजिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा समावेश आहे. 102 आयपीएल सामन्यांमध्ये 80 विकेट्स आणि 120.57 च्या स्ट्राईक रेटने 1137 धावा इरफानच्या नावावर आहेत. गतवर्षी रायजिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळताना मात्र इरफान आपला प्रभाव पाडू शकला नव्हता. तीन सामन्यांमध्ये त्याने फक्त 11 धावा केल्या होत्या, तर एकही विकेट घेण्यात त्याला यश मिळालं नव्हतं.
ड्वेन ब्राव्हो या सीझनमध्ये एकही सामना खेळला नसून स्पर्धेच्या सेंकड हाफमध्ये तो खेळेल अशी अपेक्षा होती. राजरकोटमध्ये तो उपचार घेत आहे, मात्र अद्याप सारवलेला नाही. "मी रिकव्हर होत आहे. माझ्या तब्येतीत सुधारणा होत असून मी सरावात सहभागी होत आहे. पण माझं शरीर पुर्णपणे खेळण्यास तयार नाही", असं ब्रावोने सांगितलं आहे.
गेल्यावर्षी प्लेऑफपर्यंत पोहोचलेला गुजरात लायन्स सध्या सातव्या स्थानावर आहे. सात सामन्यांपैकी फक्त दोनच सामने ते जिंकू शकले आहेत.