ईशांत, भुवनेश्वरवर ‘टांगती तलवार’
By admin | Published: February 6, 2015 01:33 AM2015-02-06T01:33:57+5:302015-02-06T01:33:57+5:30
टीम इंडियाच्या गोलंदाजीचा कणा मानले जाणारे वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार हे जखमांनी त्रस्त आहेत.
नवी दिल्ली : टीम इंडियाच्या गोलंदाजीचा कणा मानले जाणारे वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार हे जखमांनी त्रस्त आहेत. विश्वषकात ते खेळतील किंवा नाही, याचा निर्णय उद्या (दि. ६) होईल. हे दोन्ही गोलंदाज पूर्णपणे फिट नसल्याने या दोघांना संघाबाहेर केले जाईल, असा कयास लावला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संघ व्यवस्थापन ईशांत, भुवी, रोहित शर्मा, जडेजा यांच्या फिटनेसविषयी भाष्य करण्यास नकार देत आहे. रोहित आणि जेडजा शनिवारी आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यापर्यंत फिट होतील, असा अंदाज वर्तविला जात असला, तरी ईशांत आणि भुवी यांच्याबद्दल खात्री देता येणार नाही.
बीसीसीआयच्या सूत्रांच्या मते, जखमी खेळाडूंना फिटनेस सिद्ध करण्यासाठी निर्धारित कालावधी देण्यात आला; पण काही खेळाडू या कालावधीत फिट होण्याची शक्यता क्षीण असल्याने या खेळाडूंऐवजी दुसऱ्या खेळाडूंना स्थान देण्याचा बोर्डाचा विचार दिसतो.
भूवी व इशांत हे दोघे बाहेर झाल्यास धवल कुलकर्णी आणि मोहित शर्मा यांचा पर्याय उरतो. असे झाल्यास वेगवान माऱ्यासाठी उमेश यादव, मोहंमद शमी, मोहित शर्मा आणि धवल कुलकर्णी हे उपलब्ध असतील. (वृत्तसंस्था)
१४ फेब्रुवारी ते २९ मार्च या कालावधीत आयोजित विश्वचषकात भारतावर जेतेपद कायम राखण्याचा दबाव असेल. गेल्या ११ आठवड्यांत भारताने आॅस्ट्रेलियात एकही विजय मिळविला नसल्याने विश्वचषकात विजयासाठी पुन्हा एकदा अनुभवी खेळाडूंवर विश्वास टाकला जाऊ शकतो.