ईशांत शर्माच्या प्रेमाची ‘प्रतिमा’
By Admin | Published: July 1, 2016 05:07 AM2016-07-01T05:07:22+5:302016-07-01T05:07:22+5:30
टीम इंडियातील काही शिलेदारांनी बोहल्यावर चढून आयुष्याच्या नवीन इनिंगला सुरुवात केल्यानंतर, भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा यानेही आता आपल्या नवीन इनिंगसाठी ‘स्टार्ट’ घेतला
नवी दिल्ली : काही महिन्यांपासून टीम इंडियातील काही शिलेदारांनी बोहल्यावर चढून आयुष्याच्या नवीन इनिंगला सुरुवात केल्यानंतर, भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा यानेही आता आपल्या नवीन इनिंगसाठी ‘स्टार्ट’ घेतला आहे. नुकताच स्टार अष्टपैलू युवराजसिंग याने साखरपुडा केल्यानंतर काही दिवसांनीच ईशांतने आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू प्रतिमासह साखरपुडा उरकला.
ईशांतची भावी पत्नी प्रतिमा भारताच्या महिला बास्केटबॉल संघातील प्रमुख खेळाडूंपैकी असून मुळची वाराणसीची आहे. विशेष म्हणजे, पाच बहिणींपैकी सर्वांत लहान असलेल्या प्रतिमाच्या सर्व बहिणीदेखील बास्केटबॉल खेळाडू आहेत.
ईशांत आणि प्रतिमा यांची लव्ह स्टोरी इंटरेस्टिंग असून, एका अग्रगण्य वर्तमानपत्राने नुकतीच याबाबत माहिती दिली. ईशांतला बास्केटबॉल खेळताना पाहिल्यानंतर पाचही बहिणींनी पसंती देऊन पास केले. एका बहिणीने ६ फूट ४ इंच उंचीच्या ईशांतला प्रतिमाचा योग्य जोडीदार म्हणून पसंती दिली. दरम्यान, ईशांत-प्रतिमा यांच्या प्रेमाची सुरुवात याआधीच झाली होती; जेव्हा एका बास्केटबॉल स्पर्धेच्या समारोप समारंभाला ईशांतला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावले होते.
या वेळी ५ बहिणींपैकी चौथ्या क्रमांकाच्या आकांक्षाने ईशांतला आपण सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये एकाच वर्गात होतो, याची आठवण करून दिली. त्या वेळी ईशांत व आकांक्षा तब्बल ५ वर्षांनी भेटले होते. यानंतर भेटीगाठी वाढल्यावर ईशांतने ५ बहिणींपैकी सर्वांत लहान प्रतिमाला इम्प्रेस करण्यासाठी खूप मेहनत घेतली, असेही कळाले. दिल्लीतील वसंत कुंज येथील डीडीए स्पोटर््स कॉम्प्लेक्स बास्केटबॉल कोर्टवर सुरू झालेली ही प्रेमकहाणी मागील आठवड्यात वाराणसीला साखरपुड्याच्या बंधनात अडकली.
आपल्या घरातील बास्केटबॉलची परंपरा पुढे नेण्यात प्रतिमा सिंह यशस्वी ठरली आहे. ज्या वेळी प्रतिमा बास्केटबॉल कोर्टवर खेळत असते, तेव्हा ती अत्यंत वेगवान व साहसी बनलेली असते. मात्र, याआधी ती अत्यंत लाजाळू होती. याबाबत डब्ल्यूएनबीएच्या माजी प्रशिक्षिक आणि भारतात युवा खेळाडूंना मार्गदर्शन केलेल्या तमिका विल्यम्स यांनी सांगितले, की सुरुवातीला अमेरिकेमध्ये प्रतिमा बास्केटबॉल कोर्टवर येण्यास खूप लाजायची. तिच्या मनातील ही भीती आणि लाज दूर करण्यावर खूप काम करावे लागले होते. परंतु, आज प्रतिमाला एक बडबडी खेळाडू म्हणून ओळखले जाते. कोर्ट अटेंडन्सपासून रेफ्रीपर्यंत सर्वांशी ती बोलत असते.
>या ५ बहिणींना एक भाऊदेखील असून त्याचे नाव विक्रांत आहे. सर्वांत लहान असलेला विक्रांत एक फुटबॉलर असून दिल्ली संघाचा मिडफिल्डर आहे. विक्रांत म्हणतो, ‘‘परिवारामध्ये खूप बास्केटबॉल खेळाडू आहेत. त्यामुळे मी फुटबॉलकडे वळण्याचा निर्णय घेतला. ईशांत तंदुरुस्तीसाठी बास्केटबॉल खेळतो आणि आम्ही
मुलींना हरवू
शकत नाही.’’
याच वेळी ईशांतच्या आक्रमक बाउन्सरचा तो चाहता असल्याचेही विक्रांतने
सांगितले.
सोशल नेटवर्किंगवर साखरपुड्याबाबत माहिती देताना ईशांत खूप भावुक झाला होता. त्याने सांगितले, ‘‘खूप लोक असतात जे तुम्हाला तुमच्या नावाने हाक मारतात; परंतु केवळ एकाच व्यक्तीसाठी ही विशेष हाक बनते. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल थँक्यू प्रतिमा... तुझ्या रूपात मी खूप चांगली मैत्रीण मिळवली असून, तू अशी व्यक्ती आहेस जिच्यावर मी विश्वास ठेवू शकतो.’’
प्रतिमा बास्केटबॉल
खेळत राहणार : प्रशांती
ईशांत शर्माबरोबर जरी लग्न
ठरले असले, तरी प्रतिमा बास्केटबॉल खेळत राहणार आहे. सर्व बहिणी हा खेळ खेळतो. ईशांतचे प्रतिमाबरोबर लग्न ठरल्यामुळे आम्ही सर्व आनंदित आहोत. तो स्वत: खेळाडू असल्यामुळे त्याचा फायदा प्रतिमाला नक्की होणार आहे. तो प्रतिमाचा खेळ पाहण्यासाठी नेहमी येत असे. त्यातच त्यांची ओळख झाली. आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. ईशांत खूप समजूतदार असून, त्याचा आम्हा सर्वांना खेळासाठी खूप पाठिंबा असतो. आमचा भाऊ जो फुटबॉल खेळतो त्यालासुद्धा ईशांतचा खूप सपोर्ट असतो. ईशांत इज अ जिनियम जिजू.
- प्रशांती सिंह (प्रतिमाची मोठी बहीण)
प्रतिमाची बहिण दिव्याने सांगितले की, ‘‘इशांत व प्रतिमाची जोडी परफेक्ट आहे. देशात बास्केटबॉल क्रिकेटच्या तुलनेत मोठा होऊ शकत नाही, परंतु प्रतिमाने आपल्या अत्यंत यशस्वी करियरचा आनंद घेतला असून ती तीच्या खेळात उत्कृष्ट आहे. इशांत खूप चांगल्या व्यक्तिमत्त्वाचा असून तो शांत आणि सन्माननीय आहे.’’
2008 मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिमाने आपली मोठी बहीण आकांक्षासह छाप पाडली होती. २०१०मध्ये आशियाई स्पर्धेत प्रतिमाने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. यानंतर गुडघ्याच्या दुखापतीमुळे प्रतिमाला आपल्या कारकिर्दीबाबत शंका आली होती. मात्र, या दुखापतीच्या एका वर्षानंतरच तिने बास्केटबॉल कोर्टवर दमदार पुनरागमन केले.