ईशांत ‘ओव्हल’वर खेळणार

By admin | Published: August 14, 2014 04:45 AM2014-08-14T04:45:48+5:302014-08-14T04:45:48+5:30

पावसाचा खेळ सुरू असला, तरी भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटीसाठी आज सराव केला.

Ishant will play on 'Oval' | ईशांत ‘ओव्हल’वर खेळणार

ईशांत ‘ओव्हल’वर खेळणार

Next

लंडन : पावसाचा खेळ सुरू असला, तरी भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटीसाठी आज सराव केला. संघ मैदानावर सरावासाठी उतरला आणि सर्वांच्याच मनात शंकेची पाल चुकचुकली. भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी मैदानात न आल्यामुळे तो आजारी पडला की त्याला दुखापत झाली, या विषयी तर्कवितर्क सुरू झाले. मात्र, संघाचे अधिकृत डॉक्टर आर. बाबा यांनी धोनीला काहीही झाले नसून, त्याला विश्रांती देण्यात आली असल्याचे स्पष्ट केले.
धोनीसाठी दोन दिवसांची विश्रांती पुरेशी नव्हती का, या प्रश्नाला उत्तर देताना धोनी यष्टिरक्षक असल्यामुळे त्याच्यावर जास्त दबाव असतो. प्रत्येक चेंडूवर त्याला उठबस करावी लागते. त्यामुळे त्याच्या गुडघ्यांना पुरेशी विश्रांती देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, भारताचा जलदगती गोलंदाज ईशांत शर्मा याने सरावादरम्यान आपल्या क्षमता चाचपल्या. लॉर्ड्सवर झालेल्या घोट्याच्या दुखापतीतून तो बरा झाल्याचे सरावादरम्यान जाणवत होते. त्यामुळे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनी सुटकेचा नि:श्वास घेतला.
क्यूरेटर गॉडन यांनी खेळपट्टीवर पुरेसे गवत ठेवले आहे. खेळपट्टीवर चेंडू चांगली उसळी घेईल. त्यामुळे फलंदाज आणि गोलंदाजांमधील कौशल्याचा खेळ पाहण्याची चांगली संधी असेल, असे गॉडन यांनी सांगितले.
भारताला ही मालिका २-२ अशी बरोबरीस सोडवायची असेल, तर फलंदाजांनी संयम आणि आत्मविश्वासाने खेळ करायला हवा. हरीकेन या वादळामुळे लंडनमध्ये काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. हवामान खात्याने सामन्यावेळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
भारतीय संघाने सराव केल्यानंतर इंग्लंडचा संघही सरावासाठी मैदानात आला. अ‍ॅँडरसने स्विंग गोलंदाजीचा सराव केला. मात्र, ओल्ड ट्रॅफोर्ड येथे २५ धावांत ६ बळी घेणारा स्टुअर्ट ब्रॉड मैदानात उतरला नाही. वरुण अ‍ॅरोनच्या गोलंदाजीवर त्याच्या नाकाला दुखापत झाली होती. त्याला या दुखापतीतून बाहेर येण्यासाठी अजून काही वेळ लागेल, असे स्पष्ट करण्यात आले.

Web Title: Ishant will play on 'Oval'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.