आयएसएसएफ विश्व नेमबाजी स्पर्धा : भारताच्या मिश्र ज्युनिअर संघाचे कांस्य, ज्युनिअर खेळाडूंची पदक कमाई कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 03:19 AM2018-09-06T03:19:16+5:302018-09-06T03:20:33+5:30
दिव्यांश सिंग पनवर आणि श्रेया अग्रवाल या ज्युनियर भारतीय नेमबाजांनी १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदक पटकाविले. त्यांनी मिश्र ज्युनियर संघाकडून ही कामगिरी केली.
चांगवोन : दिव्यांश सिंग पनवर आणि श्रेया अग्रवाल या ज्युनियर भारतीय नेमबाजांनी १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदक पटकाविले. त्यांनी मिश्र ज्युनियर संघाकडून ही कामगिरी केली. मात्र, आयएसएसएफ विश्व नेमबाजी स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारतीय वरिष्ठ नेमबाजांनी निराशा केली. त्यांच्या खात्यात एकही पदक पडले नाही.
दिव्यांश आणि श्रेया यांनी ४२ संघांच्या क्वालिफिकेशन फेरीत ८३४.४ गुणांसह पाचव्या स्थानी राहाताना पाच संघांत अंतिम फेरीमध्ये जागा मिळवली. या दोघांनी अंतिम फेरीत एकूण ४३५ गुण मिळवत कांस्यपदकावर नाव कोरले. या गटात, इटलीच्या सोफिया बेनेटी आणि मार्काे सुपिनी या जोडीने सुवर्णपदक तर इराणच्या सादेघियान आरमीना आणि मोहम्मद आमिर नेकोना यांनी रौप्यपदक पटकाविले. भारताची इलावेनिल वलारिवान आणि हृदय हजारिका या अन्य एका भारतीय जोडीने ८२९.५ गुणांसह १३ वे स्थान मिळविले. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन कांस्य पदके पटकाविली आहेत.
महिलांच्या गटात ५० मीटर रायफलमध्ये अनुभवी तेजस्विनी सावंत ६१७.४ गुणांसह २८ व्या स्थानी राहिली. त्याचवेळी, १० मीटर रायफल प्रकारात कोटा मिळविणारी अंजुम मोदगिल हीला ६१६.५ गुणांसह ३३ व्या स्थानी समाधान मानावे लागले. श्रेया सक्सेना हीदेखील ६०९.९ गुणांसह ५४ व्या स्थानी राहिली. या सुमार कामगिरीचा भारताच्या सांघिक प्रदर्शनावरही परिणाम झाला आणि भारतीय संघाला १८४८.१ गुणांसह सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले. (वृत्तसंस्था)
वरिष्ठ खेळाडूंकडून पुन्हा निराशा
स्पर्धेत भारताचे हे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन आहे. एकीकडे ज्युनियर नेमबाजांनी कमाल केली असतान दुसरीकडे मात्र, वरिष्ठ नेमबाजांनी निराश केले. ही स्पर्धा टोकियो येथे २०२० मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेची पहिली पात्रता स्पर्धा आहे. भारत सलग दुसºया दिवशी कोटा मिळविण्यात अपयशी ठरला.
पुरुषांच्या ५० मीटर रायफल स्पर्धेत चैन सिंह ६२३.९ गुणांसह १४ व्या स्थानी राहिला. आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक विजेता संजीव राजपूतने ६२० गुणांसह ४० वे स्थान मिळविले. चैन सिंह, राजपूत आणि गगन नारंगच्या संघाने १८५६.१ गुणांसह १५वे स्थान मिळविले.