विश्वचषक नेमबाज : ज्युनिअर गटात विश्वविक्रमासह सौरभ चौधरीचा सुवर्णवेध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 02:20 AM2018-09-07T02:20:16+5:302018-09-07T02:23:19+5:30
सौरभ चौधरीने आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत विश्वविक्रमासह ज्युनिअर १० मीटर एअर पिस्तुल गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली.
चांगवोन : सौरभ चौधरीने आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत विश्वविक्रमासह ज्युनिअर १० मीटर एअर पिस्तुल गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याचवेळी अभिषेक वर्माला गुरुवारी सिनिअर गटात आठव्या स्थानावर समाधान मानावे लागल्यामुळे आॅलिम्पिक कोटा मिळविता आला नाही.
सौरभने ५८१ गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहताना अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. त्याने फायनलमध्ये २४५.५ अंकांची नोंद करीत आपलाच विश्वविक्रम मोडला. अर्जुनसिंग चीमाने आठ खेळाडूंच्या फायनलमध्ये २१८ अंकांसह कांस्यपदक पटकावले. सौरभने सर्वप्रथम जून महिन्यात आयएसएसएफ विश्वकपदरम्यान १० मीटर एअर पिस्तुलमध्ये विश्वविक्रम नोंदवला होता. पात्रता फेरीत अव्वल स्थानावर असलेला कोरियाचा होजिन लिम २४३.१ अंकांसह रौप्यपदकाचा मानकरी ठरला.
सौरभच्या स्पर्धेत अर्जुनसिंग चीमाने कांस्यपदक पटकावले, तर भारतीय संघ आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या १६ वर्षीय सौरभच्या चमकदार वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर रौप्यपदक पटकावण्यात यशस्वी ठरला. सौरभ, चीमा व अनमोल यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने एकूण १७३० गुणांची कमाई करत रौप्यपदकाचा मान मिळवला. १७३२ गुणांची नोंद करणारा कोरियन संघ विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकावण्यात यशस्वी ठरला. रशियाने १७११ गुणांसह कांस्यपदक पटकावले.
सिनिअर गटात भारतीय नेमबाज वैयक्तिक छाप सोडण्यात अपयशी ठरले, पण १० मीटर एअर पिस्तुल सांघिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावण्यात यशस्वी ठरले. रौप्यपदक विजेत्या संघात वर्माचा समावेश होता. आशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाºया वर्माने पात्रता फेरीत ५८३ गुणांची नोंद केली. त्याने १० मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत पात्रता फेरीत तिसरे स्थान पटकावित अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली व भारताच्या पदकाच्या आशा कायम राखल्या. अभिषेक अंतिम फेरीत ११८ गुणांसह आठव्या व अखेरच्या स्थानी राहिला. कोरियाच्या जिन जोंहोहने सुवर्णपदक पटकावले. जोंगोह व रशियाचा आर्तेम चेर्नेसोव्ह यांचे समान २४१.५ गुण होते, पण कोरियन नेमबाजाने शूटआॅफमध्ये बाजी मारली. अभिषेक, मिथरवाल व रिज्वी यांचा समावेश असलेला संघ रौप्यपदक पटकावण्यात यशस्वी ठरला. सिनिअर गटात वर्मा, ओमप्रकाश मिथरवाल आणि शाहजार रिज्वी या त्रिकुटाने १० मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत एकूण १७३८ गुणांसह संघाला रौप्यपदक पटकावून दिले. (वृत्तसंस्था)
ज्युनिअर ट्रॅप संघाचे चंदेरी यश
भारताच्या ज्युनिअर पुरुष ट्रॅप संघाने रौप्यपदकाचा मान मिळवला. भारतीय संघात अमान अली इलाही, विवान कपूर व मानवादित्य सिंग राठोड यांचा समावेश होता. त्यांनी एकूण ३४८ गुणांची नोंद केली. या स्पर्धेत आॅस्ट्रेलियाने अव्वल स्थान पटकावले.
ज्युनिअर ट्रॅपमध्ये अमनने पात्रता फेरीत ११८ गुणांची नोंद करीत सहा नेमबाजांच्या फायनलमध्ये स्थान मिळवले. तेथे मात्र त्याला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. अमानने चार नेमबाजांच्या शूटआॅफनंतर अंतिम फेरीत स्थान मिळवले होते.
महिला ट्रॅपमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या श्रेयसी सिंगला १२५ पैकी ११० नेम लगावता आले. ती ३४ व्या स्थानावर राहिली.
सीमा तोमर (१०८) ४१ व्या तर वर्षा वर्मन (१०७) ४२ व्या स्थानी राहिली. भारतीय संघ ३२५ गुणांसह आठव्या स्थानी राहिला.
पाचव्या दिवसाअखेर भारताने चार सुवर्ण, सहा रौप्य आणि चार कांस्यपदकांसह एकूण १४ पदके पटकावली आहेत. भारतीय संघ कोरिया व रशिया यांच्यानंतर तिसºया स्थानी आहे.