आठवडाभरात फुटबॉल संघ उभारणे कठीण
By admin | Published: June 27, 2017 12:47 AM2017-06-27T00:47:58+5:302017-06-27T00:47:58+5:30
भारतात विविध वयोगटात सातत्यपूर्ण प्रक्रिया राबविली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या काही
नवी दिल्ली : भारतात विविध वयोगटात सातत्यपूर्ण प्रक्रिया राबविली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या काही दिवसांआधी संघ उभारणी करणे फारच कठीण असल्याचे मत भारतीय फुटबॉल संघाचे कोच स्टीफन कॉन्स्टेनटाईन यांनी व्यक्त केले आहे.
देशात खेळाडूंचा प्रवाह येताना दिसत नाही. यामुळेच विविध वयोगटातील प्रतिभावान खेळाडूंची फळीदेखील तयार होताना दिसत नाही, असे मत नोंदवीत कॉन्स्टेनटाईन पुढे म्हणाले, ‘खेळाडूंमध्ये समन्वय निर्माण होण्यास या बाबी आवश्यक आहेत. पण आवश्यक बाबींवर भर दिला जात नसल्यामुळे स्पर्धेच्या काही दिवसांआधी विविध प्रदेशातील खेळाडूंचा एकत्र सरावदेखील घेणे कठीण होऊन बसले आहे. भारताच्या २३ वर्षांखालील संघातील खेळाडूंनी काही दिवसांआधी एकत्र सराव सुरू केला आहे. पुढील महिन्यात कतारमध्ये होणाऱ्या आशियाई पात्रता स्पर्धेसाठी संघबांधणी करायची असल्याने आम्ही डॉ. आंबेडकर स्टेडियममध्ये राष्ट्रीय संघाचा सराव सुरू केला. तथापि, विविध राज्यांतील खेळाडूंना समन्वय साधण्यास पुरेसा कालावधी मिळणे आवश्यक आहे.’
भारतीय सीनियर संघाने आशियाई पात्रता फेरीत १३ जून रोजी किर्गिस्तानवर १-० ने विजय नोंदविल्यापासून विश्रांतीचा निर्णय घेतला. त्यामुळे कॉन्स्टेनटाईन हे २३ वर्षांखालील संघाकडे अधिक लक्ष देत आहेत. भारताचा सिरिया, तुर्कमेनिस्तान आणि यजमान कतारसोबत एकाच गटात समावेश करण्यात आला आहे.
कॉन्स्टेनटाईन म्हणाले, ‘जी मुले माझ्या मार्गदर्शनात सराव करीत आहेत, त्यांना सामन्यादरम्यान त्रास होऊ शकतो, कारण सर्व मुलांनी दहा दिवस आधीपासून सराव सुरू केला. आमच्या गटातील सर्व संघ आणि आमच्या संघात मोठी तफावत आहे. भारत वगळता सर्वच संघातील खेळाडू गेल्या अनेक वर्षांपासून सोबत सराव करीत आहेत. आमच्याकडे १७, १९ आणि २३ वर्षांखालील खेळाडूंची फळी निर्माण करणारी कुठलीही प्रक्रिया नाही. भारतीय संघातील काही खेळाडू १९ वर्षांखालील संघात खेळले आहेत; पण सर्वांमध्ये समन्वयाचा अभाव जाणवतो. तथापि, पराभव पत्करण्यासाठी आम्ही जाणार नाही. काही आठवड्यांत संघ सज्ज करणे कठीण असले, तरी आम्ही सामन्यागणिक विजय मिळविण्यावर भर देणार आहोत. देशातील २८-३० मुलांना एकत्र आणून संघ तयार करणे फारच गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ताण असला तरी आम्ही संघ उभारण्याचा प्रयत्न करीत आहोत.’ (वृत्तसंस्था)