सर्वच मुद्द्यांवर बोलणे अशक्य- राज्यवर्धनसिंग राठोड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 02:41 AM2018-07-20T02:41:50+5:302018-07-20T06:46:21+5:30
केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण मंत्री राज्यवर्धनसिंग राठोड म्हणाले,‘माझ्यावर मोठी जबाबदारी असून मी प्रत्येक बाबतीत वक्तव्य करू शकत नाही.’
नवी दिल्ली : विश्व अंडर-२० चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या हिमा दासच्या इंग्रजीबाबत भारतीय अॅथ्लेटिक्स महासंघाच्या (एएफआय) टिपणीबाबत प्रतिक्रिया मागितली असता केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण मंत्री राज्यवर्धनसिंग राठोड म्हणाले, ‘माझ्यावर मोठी जबाबदारी असून मी प्रत्येक बाबतीत वक्तव्य करू शकत नाही.’ लोकसभेत आज प्रश्नाच्या तासाला गौरव गोगोई यांनी पुरवणी प्रश्न विचारताना राठोड यांना हिमा दासबाबत एएफआयच्या टिपणीवर स्पष्टीकरण मागितले होते. सुरुवातीला राठोड यांनी याबाबत काहीच मत व्यक्त केले नाही, पण गोगोई यांनी वारंवार जोर दिल्यानंतर ते म्हणाले, माझ्यावर मोठी जबाबदारी असून मी प्रत्येक बाबीवर टिपणी करू शकत नाही. राठोड यांच्या या वक्तव्यावर गोगोईसह काँग्रेसच्या अन्य खासदारांनी विरोध दर्शविला. राठोड यांच्या उत्तरदरम्यान गोगोई त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागत होते.
क्रीडा मंत्र्यांकडे स्पष्टीकरणा मागणाºया विरोधी पक्षाच्या काही सदस्यांना बसण्याची विनंती करताना लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन म्हणाल्या, त्यांनी (राठोड यांनी) कुठलीही अशी चूक केलेली नाही. युवा मंत्री असून चांगले कार्य करीत आहेत, असेही अध्यक्षा म्हणाल्या.
हिमा दासने पदक पटकावल्यानंतर ट्विटमध्ये एएफआयने म्हटले होते की, पहिल्या विजयानंतर मीडियासोबत बातचित करताना हिमाची इंग्रजी एवढी चांगली नव्हती. पण, तिने चांगला प्रयत्न केला. आम्हाला त्याचा अभिमान आहे.
त्यानंतर टीका झाल्यावर महासंघाने खेद व्यक्त करताना आमची धावपटू कुठल्याही आव्हानाला घाबरत नाही, हे दाखविण्याचा आमचा उद्देश असल्याचे म्हटले होते. आमच्या टिष्ट्वटमुळे ज्या भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या त्याबाबत आम्ही त्यांची माफी मागतो, असेही महासंघाने स्पष्ट केले होते. (वृत्तसंस्था)
>खेळातील राजकारण संपायला हवे
भारतीय खेळातून राजकारण
संपायला हवे, असे मत क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी व्यक्त केले. लोकसभेत प्रश्नाच्या तासात काँग्रेस सदस्य रंजित रंजन यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राठोड बोलत होते.
>आयओएची शुक्रवारी बैठक । क्रीडा मंत्रालयाच्या प्रस्तावावर होणार चर्चा
पदकाची शक्यता बळावण्यासाठी आशियाई स्पर्धेसाठी निवडीच्या निकषामध्ये सूट देण्याच्या क्रीडा मंत्रालयाच्या विनंतीनंतर भारतीय आॅलिम्पिक महासंघाने (आयओए) भविष्यातील कार्यवाहीसाठी शुक्रवारी आपल्या कोअर व विधी समितीची बैठक बोलविण्याचा निर्णय घेतला आहे.क्रीडा मंत्रालयाने बुधवारी आयओएला आवाहन केले होते की, खेळ व खेळाडूंच्या हितासाठी विशिष्ट प्रकरणात निवड निकषांमध्ये सूट देण्यात यावी. यापूर्वी आशियाई स्पर्धेसाठी प्रवेश निश्चित करण्यात अपयशी ठरल्यानंतर विविध खेळाडू व संघांनी चिंता व्यक्त केली होती.आयओएचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांना लिहिलेल्या पत्रात मंत्रालयाने म्हटले की, आशियाई स्पर्धेत पदक जिंकण्याची किंवा अव्वल चारमध्ये राहण्याची शक्यता असेल तर खेळाडू किंवा संघांना मंजुरी दिली जाऊ शकते.
यानंतर आयओए अडचणीत सापडले व आॅलिम्पिक महासंघाने क्रीडा मंत्रालयाला उत्तर देण्यासाठी कोअर व विधी समितीसोबत चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. आयओएचे महासचिव राजीव मेहता म्हणाले, ‘या विषयी उत्तर देण्यासाठी आम्ही कोअर व विधी समितीची शुक्रवारी सकाळी ११ वाजता बैठक बोलविली आहे.
रंजित रंजन यांनी प्रश्न केला की, माजी खेळाडूंना तो सन्मान का मिळत नाही ज्याचे ते हकदार आहेत. त्याचप्रमाणे त्यांना नोकरी देण्यासाठी किंवा आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकार काय करीत आहे?
त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राठोड म्हणाले,‘भारतीय खेळातील राजकारण संपायला हवे, असे माझे मत आहे. जगदंबिका पाल यांच्या पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना राठोड म्हणाले, मणिपूरमध्ये राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना होत असून भविष्यात अन्य राज्यांमध्ये त्याचे केंद्र उघडण्यात येईल.’