देशात क्रीडा संस्कृतीला चालना देणे आवश्यक, तरच भविष्यातील चॅम्पियन पुढे येतील - अभिनव बिंद्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:04 AM2017-08-26T00:04:28+5:302017-08-26T00:04:36+5:30
योग्य तयारी, संयम आणि विजयाची भूक ही यशाची त्रिसूत्री आहे. या त्रिसूत्रीनुसार देशात क्रीडा संस्कृतीला चालना देण्यात आली तरच भविष्यातील चॅम्पियन पुढे येतील, असे मत आॅलिम्पिक सुवर्ण विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याने व्यक्त केले आहे.
नवी दिल्ली : योग्य तयारी, संयम आणि विजयाची भूक ही यशाची त्रिसूत्री आहे. या त्रिसूत्रीनुसार देशात क्रीडा संस्कृतीला चालना देण्यात आली तरच भविष्यातील चॅम्पियन पुढे येतील, असे मत आॅलिम्पिक सुवर्ण विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याने व्यक्त केले आहे.
बीजिंग आॅलिम्पिकमध्ये दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण विजेता अभिनव म्हणाला,‘क्रीडा संस्कृती, योग्य माहिती तसेच आधुनिक पायाभूत सुविधांअभावी चॅम्पियन घडू शकणार नाहीत. क्रीडा संस्कृतीची सुरुवात तर मातापित्यापासूनच व्हायला हवी. आईवडिलांनी आठवड्यातून किमान एक दिवस मुलांसोबत खेळावे. सिनेमा पाहणे, फिरायला जाण्यापेक्षा सामन्याला हजेरी लावल्याने खेळांचे महत्त्व मुलांच्या मनावर बालपणापासून रुजेल.’
नीती आयोगाने आयोजित केलेल्या सोहळ्यात बिंद्राने स्वत:च्या आॅलिम्पिक प्रवासाचे पुनरावलोकन केले. तो म्हणाला,‘क्रीडा संस्कृतीसोबतच कोचिंग, सराव, उपकरणे आणि आहाराची माहिती हवीच शिवाय आधुनिक पायाभूत सुविधादेखील हव्यात. मी देशात सराव करण्याच्या बाजूने होतो पण योग्य सुविधा नसल्याने देशाबाहेर जावे लागायचे. खेळाडू लालफितशाहीत अडकणार नाहीत, याचीही खबरदारी घ्यावी लागेल. महाशक्ती असलेल्या चीनने समजले तसे आॅलिम्पिक खेळाचे महत्त्व समजून घ्यावे लागेल.’
२००० च्या सिडनी आॅलिम्पिकमध्ये कमी वयात पदार्पण केल्यानंतर अथेन्स आॅलिम्पिकमध्ये तो सातव्या स्थानी राहिला. २००८ ला बीजिंगमध्ये सुवर्ण जिंकले तर २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये पदकाने त्याला हुलकावणी दिली होती. तो म्हणाला,‘अथेन्स आॅलिम्पिकने मला सावध केले. अंधूक प्रकाशात नेम साधण्याचा प्रयत्न करीत अनुभवातून सज्ज झालो. रिओ आॅलिम्पिकपूर्वी मी जर्मनीत सरावादरम्यान शरीराचे विश्लेषण करणारे ‘टेक्नो बॉडी’ हे पोर्टेबल यंत्र पाहिले. मी हे यंत्र खरेदी केले तेव्हा शरीराची रचना समजण्यास मदत झाली.’
निवृत्तीचा निर्णय घाईत घेतला का, असे विचारताच बिंद्राचे उत्तर होते... नाही! तो म्हणाला,‘मी पुढील आॅलिम्पिक खेळू शकलो असतो पण आता थांबायला हवे, असे मनात आले व ते स्वीकारले. खेळ सोडल्याचे दु:ख नाही. तब्बल २२ वर्षे नेमबाजी हेच माझे आयुष्य होते. आता खासगी आयुष्यात व्यस्त आहे. भारतीय नेमबाजांचे भविष्य उज्ज्वल आहे. नेमबाजांची आॅलिम्पिकपर्यंत वाटचाल सोपी व्हावी अशा गोष्टी कराव्या लागतील.’(वृत्तसंस्था)
अपयशातून यशाचा मार्ग...
२२ वर्षांच्या करियरमध्ये पाच आॅलिम्पिकचा अनुभव असलेला बिंद्रा यंदा रिओ आॅलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर घसरताच नेमबाजीतून निवृत्ती जाहीर केली. करियरमध्ये कितीही चढउतार आले तरी अपयशातून यशाचा मार्ग शोधण्यास आपले प्राधान्य राहिले, असे बिंद्राचे मत आहे.