झटपट क्रिकेटमध्ये धावडोंगरही ओलांडणे शक्य!
By admin | Published: January 19, 2017 12:55 AM2017-01-19T00:55:34+5:302017-01-19T00:55:34+5:30
बॅटिंग विकेट असेल तर धावडोंगरही ओलांडता येतो, हे पुणे वन डेतील निकालामुळे स्पष्ट झाले.
बॅटिंग विकेट असेल तर धावडोंगरही ओलांडता येतो, हे पुणे वन डेतील निकालामुळे स्पष्ट झाले. पुण्याची खेळपट्टी बॅटिंगसाठीच होती. ‘मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे’सारखी खेळपट्टी वेगवान जाणवली. गोलंदाजांना येथे संधी नव्हतीच. दिग्गज फलंदाजांपुढे दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी धावांची लूट केली. अशाच खेळपट्ट्या पुरविण्यात आल्यास गोलंदाज एक दिवस घरी विश्रांती घेणे पसंत करतील. लक्ष्य गाठताना दव असेल काय किंवा नसेल काय, काहीच फरक पटणार नाही.
इंग्लिश फलंदाजांनी अपेक्षेनुरुप धावांचा पाऊस पाडला. त्यांनी कसोटीत भेदक ठरलेल्या आश्विनला देखील झोडपले.अन्य गोलंदाजांचा भुरका झाला. जेसन रॉयने मारलेले फटके आनंददायी होते. ज्यो रुट देखील लयीत होता. मोक्याच्या क्षणी मात्र तो अपयशी ठरला. मोर्गन आणि बटलर यांनीही निराशा केली. बेन स्टोक्सने मात्र संघातील सर्वांत उत्साही खेळाडू का मानले जाते हे सिद्ध केले. त्याने षटकारांची आतशबाजी करीत इंग्लंडला ३५० पर्यंत नेऊन ठेवले.
संघाला विजयासाठी षटकामागे सात धावांची गरज असते तेव्हा फलंदाजांना स्थिरावण्यास पुरेसा वेळ नसतोच. शिखर धवन धावगती वाढविण्याच्या नादात थर्डमॅनवर झेलबाद झाला. वन डे क्रिकेटमध्ये ही सामान्यबाब आहे. के. एल. राहुलच्या बॅट- पॅडमधून चेंडू जाताना दिसले तर धोनी सेट होण्याच्या स्थितीत एक- दोन जलद धावा घेत राहीला.
एक जुनी म्हण आहे.‘ वेळ येताच योद्धा रणांगणात येतो.’ विराटने केदारच्या सोबतीने ही म्हण सार्थ ठरविली.केदारने देखील संघातील स्थानाला न्याय दिला. याआधी केदारला खूप षटके खेळण्याची
संधी मिळाली नव्हती. तो चांगला फलंदाज म्हणून परिचित ोहता मात्र ‘गेम चेंजर’ म्हणून तो प्रथमच पुढे आला. केदारने कर्णधाराच्या सोबतीने खेळ कररीत एकवेळ कर्णधाराला देखील मागे टाकले. कर्णधाराने देखील त्याचे मनोधैर्य उंचावले. त्याचे काही फटके वर्णनापलिकडचे होते. केदारने क्रिझवरून मारलेले षटकार तसेच बॅकफूटवर जात लाँग आॅनवर मारलेला उंच फटका नजरेत भरण्यासारखाच होता. फिरकीपटूंविरुद्ध केदारला खेळताना पाहण्याची ती पहिलीच वेळ होती. मैदानावरील दोघांची जुगलबंदी
पाहून आम्हाला समालोचन कक्षात बसणे कठीण जात होते. हीच तर भारतीय संघाची खरी ताकद आहे, आता मोर्गन अॅन्ड कंपनीला मालिकेत चुरस कायम राखण्यासाठी कटकमध्ये नवे काही करुन दाखवावे लागणार आहे. (पीएमजी)