कोणत्याही क्रिकेटपटूची गुप्त माहिती उघड करणे चुकीचे- अनुराग ठाकूर
By admin | Published: September 27, 2016 09:01 PM2016-09-27T21:01:52+5:302016-09-27T21:01:52+5:30
बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी क्रिकेटपटूंची गुप्त माहिती उघड केल्याप्रकरणी माजी निवड समिती प्रमुख संदीप पाटील यांच्यावर उपरोधिक टीका केली
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी क्रिकेटपटूंची गुप्त माहिती उघड केल्याप्रकरणी माजी निवड समिती प्रमुख संदीप पाटील यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. सचिन तेंडुलकर आणि एम एस. धोनीसारख्या महान क्रिकेटपटूंबाबतची गुप्त माहिती उघड करणं चुकीचं आहे. अशा प्रकारे त्यांची गुप्त माहिती उघड करणा-यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं वक्तव्य अनुराग ठाकूर यांनी केलं आहे.
संदीप पाटील हे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसंदर्भात काही गुप्त माहिती उघड केली होती. 2015च्या वर्ल्डकपच्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार असलेल्या धोनीलाही त्यावेळी पदावरून दूर करण्याचा निर्णय विचाराधीन असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्या मुद्द्यावरूनच अनुराग ठाकूर यांनी त्यांना लक्ष्य केलं आहे.
संदीप पाटील हे माजी निवड समितीचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारे वक्तव्य करणं त्यांना शोभत नाही. जेव्हा ते अध्यक्ष होते त्यावेळी या विषयांवरील प्रश्नांना त्यांनी वेगळी उत्तर दिली होती. मात्र आता त्यांची भूमिका बदललेली दिसते आहे, असे अनुराग ठाकूर म्हणाले आहेत. पाटील यांनी निवड समितीसारखं जबाबदारीचं पद सांभाळलं आहे. त्यामुळे अशी वक्तव्ये करण्यापासून शक्यतो त्यांनी दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच पाटील यांच्या वक्तव्यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही सूतोवाच अनुराग ठाकूर यांनी केले आहेत.