इटली झुंजले, अखेर उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 05:38 AM2021-06-28T05:38:01+5:302021-06-28T05:39:14+5:30
युरो चषक फुटबॉल ; ऑस्ट्रियाला २-१ असे नमवले
लंडन : अत्यंत रोमांचक झालेल्या सामन्यात इटलीला ऑस्ट्रियाविरुद्ध चांगलेच झुंजावे लागले. मात्र, दडपणात चांगला खेळ केलेल्या इटलीने अखेर ऑस्ट्रियाचा २-१ असा पराभव केला आणि युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
या शानदार कामगिरीसह इटलीने सलग विक्रम १२वा विजय मिळवला. त्याचप्रमाणे यावेळी, तब्बल १९ तासांहून अधिक वेळानंतर इटलीविरुद्ध एखाद्या प्रतिस्पर्धी संघाने गोल केला. फेडरिको चीसा आणि मॅतियो पेसिना यांनी प्रत्येकी एक गोल करत इटलीला विजय मिळवून दिला. सामन्यातील तिन्ही गोल दुसऱ्या सत्रात आणि तेही निर्धारित वेळेनंतर झाले.निर्धारित वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर अतिरिक्त वेळेत इटलीने तुफानी आक्रमक खेळ केला. यावेळी ९५व्या मिनिटाला फेडरिकोने शानदार गोल करत इटलीला आघाडीवर नेले. १०५व्या मिनिटाला पेसिनाने गोल करत इटलीची आघाडी भक्कम केली. ऑस्ट्रियाकडून सासा क्लाजदिक याने ११४व्या मिनिटाला गोल करत सामन्यात रंग भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, यानंतर इटलीने भक्कम बचाव करत अतिरिक्त धोका न पत्करता सामन्यात २-१ अशी बाजी मारली आणि दिमाखात पुढच्या फेरीत प्रवेश केला. आता उपांत्यपूर्व फेरीत इटलीचा सामना गतविजेता पोर्तुगाल आणि जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या बेल्जियम यांच्यातील विजेत्याविरुद्ध होईल. वडिलांच्या कामगिरीची पुनरावृत्ती फेडरिकोचे वडील एनरिको चीसा यांनीही इटलीच्या फुटबॉल संघाकडून छाप पाडत २५ वर्षांपूर्वी १९९६ साली इंग्लंडमध्ये झालेल्या युरो स्पर्धेत गोल केला होता. त्यावेळी इटली संघाचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले होते. मात्र, फेडरिकोने त्यापुढचे पाऊल टाकत इटलीसाठी गोल करुन संघाला उपांत्यपूर्व फेरीत नेण्यात योगदान दिले.
चेक प्रजासत्ताकने नेदरलॅण्डला नमवले, उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
बुडापेस्ट : युरो कपच्या बाद फेरीच्या सामन्यात एकर्फी एकतर्फी झालेल्या सामन्यात चेक प्रजासत्ताकने नेदरलॅण्डला २-० असे पराभूत केले. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांना गोल करता आला नव्हता. त्यात मात्र नेदरलॅण्डच्या मथिज्स याला ५५ व्या मिनिटाला रेड कार्ड दाखवण्यात आले. तो बाहेर गेल्यावर डच संघाला फक्त दहा खेळाडूंसह खेळावे लागले. त्यानंतर मात्र सामन्याचा नूरच पालटला. चेकच्या संघाने नेदरलॅण्डच्या गोलपोस्टवर जोरदार हल्ले चढवायला सुरूवात केली. ६८ मिनिटाला त्यांना पहिले यश मिळाले. थॉमस होल्स याने पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. तर ८० व्या मिनिटाला पॅट्रिक शिंक्स याने दुसरा गोल करत चेक संघाची आघाडी मजबूत केली. मिळालेल्या ६ अतिरिक्त मिनिटांमध्येही नेदरलॅण्डला संधी मिळाली नाही.
इक्वेडोरचा डियाझ कोरोना पॉझिटिव्ह
अॅम्सटर्डम : इक्वेडोर संघाला कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत ब्राझीलविरुद्धच्या सामन्याआधी धक्का बसला. त्यांचा मध्यरक्षक डेमियन डियाझ कोरोनाग्रस्त आढळल्याने संघाची चिंता वाढली. इक्वेडोरच्या संघाने सोशल मीडियावरून डियाझची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. त्याला विलगीकरणात पाठवल्याचेही त्यांनी सांगितले. इक्वेडोर संघातील तो आतापर्यंतचा कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला एकमेव खेळाडू ठरला आहे. ब गटात समावेश असलेल्या इक्वेडोरने जर ब्राझीलला नमवले, तर ते उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. गटात अव्वल स्थानासह ब्राझीलने आधीच उपांत्य फेरी गाठली आहे. त्यामुळे इक्वेडोरविरुद्ध ते आपल्या काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याची शक्यता आहे.
इवान पेरिसिचला कोरोनाची लागण
पुला : क्रोएशियाचा स्टार फॉरवर्ड इवान पेरिसिच याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे युरो चषक फुटबॉल स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत पोहचलेल्या क्रोएशियाला मोठा धक्का बसला. बाद फेरीत त्यांना स्पेनच्या तगड्या आव्हानाला सामोरे जायचे आहे. पेरिसिचला आता १० दिवस विलगीकरणात राहावे लागेल. त्याचवेळी संघातील इतर खेळाडू आणि स्टाफ या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती क्रोएशिया संघ व्यवस्थापनाने दिली. क्रोएशिया संघाने सांगितले की, ‘वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी इवानला राष्ट्रीय संघातील अन्य सदस्यांपासून वेगळे केले आहे. या परिस्थितीची माहिती तातडीने अधिकाऱ्यांना दिली आहे.’ क्रोएशियाने २०१८ सालच्या विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.
जर त्यांनी स्पेनला नमवून उपांत्यपूर्व फेरी गाठली आणि त्यानंतर उपांत्य व अंतिम फेरी जरी गाठली, तरी विलगीकरणात असल्याने पेरिसिच या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. त्यामुळे आता तो स्पर्धेबाहेर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी झालेल्या स्कॉटलंँडविरुद्धच्या सामन्यात क्रोएशियाने ३-१ असा विजय मिळवला होता. यामध्ये पेरिसिचने एक गोल करत संघाच्या विजयात योगदान दिले होते. याआधी स्कॉडलँडचा मध्यरक्षक बिली गिलमोर हाही कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता.