फलंदाजीत युवराजला बढती देणं कठीण - धोनी
By admin | Published: February 13, 2016 03:47 PM2016-02-13T15:47:21+5:302016-02-13T15:54:12+5:30
युवराज सिंगला बॅटिंगमध्ये वरच्या क्रमांकावर बढती देणं अवघड असल्याचे मत कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केलं.
Next
>ऑनलाइन लोकमत
रांची, दि. १३ - टी-२० सामन्याच्या निमित्ताने भारतीय संघात पुनरागमन केलेला स्टार खेळाडू युवराज सिंगला बॅटिंगमध्ये वरच्या क्रमांकावर बढती देणं अवघड असल्याचे मत कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केलं आहे. सध्या युवराजला पहिल्या पाच फलंदाजांनतर संधी दिली जात आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या टी-२० सामन्यातील विजयात मोलाची कामगिरी बजावूनही युवराजला सध्या फलंदाजीची संधी फार कमी मिळत आहे. शुक्रवारी रांची येथे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करण्यात आला आणि धोनीने युवराजपूर्वी हार्दिक पांड्याला संधी दिली. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला युवराज खातं न उघडताच बाद झाला.
या सर्व मुद्यांवर भाष्य करताना धोनी म्हणाला, ' युवराजला फलंदाजीची संधी कमी मिळत्ये हे दिसत आहे पण, पहिले चार फलंदाज सगळ्यात उत्तम कामगिरी करत असताना युवराजला वरच्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवणं अवघड आहे.' ' सलामीच्या दोन फलंदाजांमध्ये तर बदल करु शकत नाही. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आणि चौथ्या क्रमांकावर सुरेश रैना खेळतात. ते सर्वजण भारतात व बाहेरही टी-२० सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करत असल्याने युवराजला पाचव्या क्रमांकावर पाठवण्याशिवाय पर्यायच नाही. पण मात्र, तरीही युवराजला फलंदाजीची अधिकाधिक संधी देण्याकडे माझा कल असतो' असेही तो म्हणाला.