सचिनचे विक्रम मोडणे अशक्य
By admin | Published: February 5, 2015 01:24 AM2015-02-05T01:24:44+5:302015-02-05T01:24:44+5:30
मायदेशात वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न २०११मध्ये पूर्ण करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या वेळी २०१५चा ब्रँड अॅम्बेसिडर आहे़
मेलबोर्न : मायदेशात वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न २०११मध्ये पूर्ण करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या वेळी २०१५चा ब्रँड अॅम्बेसिडर आहे़ या महान खेळाडूने वर्ल्डकपमध्ये नोंदविलेले विक्रम या वेळी तरी कुणीही मोडू शकणार नाही, हे निश्चित आहे़
सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत ४५ सामने खेळले आहेत़ यामध्ये ५६़९५च्या सरासरीने २२७८ धावा केल्या आहेत़ त्यामध्ये ६ शतके आणि १५ अर्धशतकांचा समावेश आहे़
वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या सचिननंतर श्रीलंकन क्रिकेटपटू कुमार संगकारा आणि माहेला जयवर्धने यांचा क्रमांक लागतो़ मात्र, या वर्ल्डकपमध्ये सचिनला मागे टाकणे त्यांना शक्य होणार नाही़ संगकाराने वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत ३० सामन्यांत ९९१ धावा केल्या आहेत,तर जयवर्धने याने ३३ सामन्यांत ९७८ धावा केल्या आहे़ जागतिक क्रमवारीत नंबर वन असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने १५ सामन्यांत ७२५ धावा केल्या आहे़ सचिनच्या वर्ल्डकपमधील ६ शतकांच्या विक्रमाला डिव्हिलियर्स आव्हान देऊ शकतो़ वर्ल्डकपमध्ये सध्या डिव्हिलियर्सच्या नावे ३ शतके आहेत़ सचिनने २००३च्या वर्ल्डकपमध्ये ११ सामन्यांत सर्वाधिक ६७३ धावा केल्या होत्या़ हा विक्रम विद्यमान
खेळाडूंना तोडायचा असेल, तर त्यांना शंभर टक्के योगदान द्यावे लागणार आहे़ (वृत्तसंस्था)
सचिनची उणीव भासणार
विद्यमान विश्वचॅम्पियन भारत आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान हे संघ आगामी वन-डे वर्ल्डकपमध्ये १५ फेब्रुवारी रोजी आमने सामने येणार आहेत़ या लढतीत टीम इंडियाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची उणीव भासणार आहे़ कारण, वर्ल्डकपमधील पहिल्यांदाच पारंपरिक प्रतिस्पर्धीविरुद्धच्या लढतीत हा महान फलंदाज नसेल़
तेंडुलकरने वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत पाकविरुद्ध झालेल्या ५ सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे़ विशेष म्हणजे या सामन्यांत तीन वेळा सचिन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला आहे़ त्यामुळे नक्कीच भारताला त्याची उणीव भासेल़