...हे तर मानसिक खच्चीकरण करण्यासारखेच
By admin | Published: September 2, 2016 03:05 AM2016-09-02T03:05:35+5:302016-09-02T03:05:35+5:30
रिओ आॅलिम्पिक स्पर्धेनंतर खेळाडंूंच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला जात असतानाच त्यांच्यावर झालेल्या खर्चाबाबत भली मोठी आकडेवारी क्रीडा मंत्रालयाने जाहीर केली.
नाशिक : रिओ आॅलिम्पिक स्पर्धेनंतर खेळाडंूंच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला जात असतानाच त्यांच्यावर झालेल्या खर्चाबाबत भली मोठी आकडेवारी क्रीडा मंत्रालयाने जाहीर केली. खेळाडूूंनी मागणी केलेला खर्चच पुढे केला जात असून, प्रत्यक्षात मंजूर खर्चाबाबत माहिती दडविली जात असल्यामुळे खेळाडूंविषयी पसरणारा गैरसमज आणि होणाऱ्या टीकेने त्यांचे मानसिक खच्चीकरण होत असून नाशिकची धावपटू कविता राऊतही याला अपवाद ठरलेली नाही.
रिओ आॅलिम्पिकनंतर खेळाडूंची कामगिरी आणि त्यांच्यावर झालेल्या खर्चाबाबत सध्या चर्चा होत आहे. आॅलिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी कवितावर सुमारे २६ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे क्रीडा विभागाकडून सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मंजूर खर्च केवळ ३ लाख ३८ हजार ५०० इतकाच असल्याचा दावा कविताने पुराव्यानिशी केला आहे. कविताला आॅलिम्पिक खर्चासाठी ३० लाख रूपये खर्चाची मर्यादा देण्यात आली होती. त्यानुसार प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले होते. कविताने २६ लाख ४१ हजार रूपयांचा प्रस्ताव सादर केला होता.
या बजेटवर स्पोर्ट्स अॅथॉरिटी आॅफ इंडिया आणि अॅथलेटिक्स फेडरेशन यांची चर्चा होऊन त्यांनी ३ लाख ३८ हजार ५०० रुपये इतकाच खर्च मंजूर केला. कविता ही साईच्या क्रीडा शिबिरात सराव करीत असून तेथील शासकीय सुविधांचा लाभ मिळत असल्यामुळे मागणी खर्चातून (२६ लाखांमधून) हा सर्व खर्च वजावट करून केवळ ३ लाख ३८ हजार रुपये मंजूर करण्यात आल्याचे पत्रच कविताला देण्यात आले होते. त्यामुळे कवितावर २६ लाखांचा खर्च झाल्याच्या चर्चेवर तिनेही आक्षेप घेत मनस्ताप व्यक्त केला.
वास्तविक आॅलिम्पिकसाठी आपण २०१४ पासून तयारीला लागलो असून त्यासाठी आपणाला आतापर्र्यंत २० ते २१ लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक खर्च आला आहे. परंतु स्पर्धेहून परत आल्यानंतर आपली कामगिरी आणि आपणावरील खर्चाबाबत उलटसुलट चर्चेने मानसिक त्रास होत असल्याचेही कविताने म्हटले आहे. भर उन्हात ४२ किलोमीटरच्या स्पर्धेत धावण्याचे आव्हान काय असते ते आपण अनुभवले असताना केवळ भारतात राहून टीका करणाऱ्यांमुळे सरावावर परिणाम होत असल्याची खंतही तिने व्यक्त केली.
सहन करण्यापलीकडचे
आपणावर झालेला खर्च हा चुकीचा दाखविण्यात येत आहे. आॅलिम्पिकसाठी २६ लाखांचा खर्च केलेला नाही. तो केवळ एक प्रस्ताव दिला होता. तोही पूर्णपणे मंजूर झालेला नाही. मंजूर खर्च केवळ ३ लाख ३८ हजार ५०० इतकाच आहे. वास्तविक आपण स्वत: केलेला वैयक्तिक खर्चच यापेक्षा अधिक आहे. महाराष्ट्राच्या इतर अॅथलेटिक्सच्या खर्चाबाबत कुणी बोलत नाही. माझ्याच खर्चाबाबत चर्चा का व्हावी? हे सर्व सहन करण्यापलीकडचे आहे. ज्या गोष्टी प्रत्यक्षात नाहीत त्याविषयी अधिक चर्चा केली जाते. यामुळे खेळाडू व खेळावरही परिणाम होतो. आपणाला कोणत्याही वादात पडायचे नाही. खेळावर लक्ष केंद्रित करायचे आहे. टीकाकारांनी वस्तुस्थिती लक्षात घेऊन बोलावे इतकेच.- कविता राऊत, धावपटू
भारतीय प्रशिक्षकांच्या पात्रतेविषयी बोलणाऱ्यांना भारतीय प्रशिक्षकांनीच उत्तर दिले आहे. भारतीय प्रशिक्षक आणि खेळाडू यांना बदनाम करण्याचे षडयंत्र थांबवावे
- विजेंद्रसिंग, प्रशिक्षक
प्रशिक्षकांनी पात्रता सिद्ध केली
रिओ आॅलिम्पिकमध्ये साक्षी मलिक, पी. व्ही. सिंधू या दोघींनी पदके मिळविली त्यांचे प्रशिक्षक हे भारतीयच होते. चौथ्या स्थानावर राहिलेल्या दीपा कर्माकरलादेखील भारतीय प्रशिक्षकाचेच मार्गदर्शन लाभले. त्यामुळे भारतीय प्रशिक्षकांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहेच.
असे असताना परदेशी प्रशिक्षकांवर कोट्यवधींचा खर्च का केला जातो, असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. परदेशी प्रशिक्षकांनी केलेल्या कामगिरीचे मूल्यमापन व्हावे, असा मतप्रवाहही यानिमित्ताने समोर आला आहे.
कविता राऊतचे
असेही म्हणणे़़़
रिओ आॅलिम्पिकमध्ये प्रतिकूल परिस्थितीतही सर्व अडचणींवर मात करीत धावत राहिले. टीकाकारांनीही आपल्या कामगिरीविषयी टीका केली असली तरी स्पर्धा पूर्ण करणे हे आपले ध्येय होते.
महाराष्ट्राच्या धावपटूने
स्पर्धा अर्धवट सोडल्याचा डाग लागू नये आणि त्यामुळे उदयोन्मुख धावपटूंचे खच्चीकरण होऊ नये, माझ्याकडे बघून या खेळाकडे येणाऱ्या धावपटूंसाठी आपण स्पर्धा पूर्ण केली.
या स्पर्धेविषयी आपण कोणतीही आणि कुणाबाबतही तक्रार केलेली नाही, मात्र ज्या पातळीवर टीका होत आहे ती पाहून मानसिक खच्चीकरण होत आहे. खेळामध्ये चढ-उतार होतच असतात.