ही तर मीडियाची टोलेबाजी : शुक्ला
By Admin | Published: September 23, 2015 11:17 PM2015-09-23T23:17:19+5:302015-09-23T23:17:19+5:30
बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षाच्या खुर्चीवर कोण विराजमान होईल याची चाचपणी केवळ मीडियातच होत आहे.
कानपूर : बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षाच्या खुर्चीवर कोण विराजमान होईल याची चाचपणी केवळ मीडियातच होत आहे. या विषयावर कुठलीही चर्चा सुरू नसताना केवळ टोलेबाजी ऐकायला मिळते. अध्यक्षपदाचा निर्णय आमसभेला घ्यायचा
असल्याचे मत आयपीएल आयुक्त राजीव शुक्ला यांनी बुधवारी व्यक्त केले.
अध्यक्षपदाच्या शर्यतीत शुक्ला यांचेही नाव आले आहे. उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेच्या आमसभेत सहभागी होण्यासाठी आलेले शुक्ला यांना यासंदर्भात विचारताच ते म्हणाले,‘ याबाबत आताच बोलणे घाईचे ठरेल. जी नावे येत आहेत त्या केवळ अफवा आहेत. बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर हे लवकरच आमसभा बोलावतील. आमसभा नव्या अध्यक्षांचा निर्णय घेईल. जोवर आमसभा बोलविण्यात येत नाही तोवर माझ्यामते नव्या अध्यक्षाबाबत अफवा पसरविण्यात येऊ नये.’
कोण अध्यक्ष होईल, याबाबतच्या अफवांना मीडियामध्ये ऊत आले आहे. पण माझ्यामते हे योग्य नाही. जोपर्यत बैठक होत नाही तोपर्यंत अंदाज वर्तविण्यात अर्थ नाही, असे सांगून स्वत: अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याच्या प्रश्नावर शुक्ला म्हणाले,‘कोण चढाओढीत आहे हे मी आताच कसे
सांगू शकेन. याबाबत मला अधिक बोलायचे नाही.’
नवी दिल्ली : बीसीसीआयच्या अध्यक्षपदी कोण, याविषयी डावपेच आखण्यासाठी बोर्डाचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी आपल्या विश्वासू लोकांना औपचारिकरीत्या निमंत्रण दिले आहे. बेंगळुरु येथे ही बैठक होईल. या बैठकीसाठी श्रीनिवासन यांनी विश्वासातील आठ-नऊ जणांना बोलविल्याची माहिती आहे. या बैठकीत आमसभेत काय बोलायचे याचे डावपेच ठरणार असून दिवंगत अध्यक्ष दालमिया यांच्या जागी कुणाला बसवायचे याबद्दल विचार करण्यात येणार आहे.
श्रीनिवासन यांचे विश्वासू तसेच एका राज्य संघटनेचे ज्येष्ठ सदस्य असलेल्या व्यक्तीने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, बेंगळुरु येथे भेटीसाठीचे आमंत्रण मिळाले आहे. भविष्यात काय घडू शकते याचे संकेत मिळतील. अध्यक्षपदाचे दावेदार असलेले अमिताभ चौधरी हे स्वत: पूर्व आणि द. विभागातील काही पदाधिकाऱ्यांसोबत उपस्थित राहतील.
कॅबने घेतलेल्या निर्णयानुसार बंगाल क्रिकेट संघटनेचा कुठलाही पदाधिकारी या बैठकीत सहभागी होणार नाही. दरम्यान बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी देखील पडद्यामागे पूर्व विभागाच्या प्रतिनिधींसोबत संपर्क सुरू केला.पूर्व विभागातील पदाधिकाऱ्यांच्या डोक्यात नेमके काय आहे हे जाणून घेण्यासाठी काही गटांना त्यांनी देखील आमंत्रित केल्याचे कळते. ठाकूर हे अध्यक्षपदासाठी शुक्ला यांच्या नावाची शिफारस करीत आहेत. विशेष असे की मागच्या निवडणुकीत शुक्ला हे कोषाध्यक्षपदाच्या लढतीत हरियाणाचे अनिरुद्ध चौधरी यांच्याकडून पराभूत झाले होते. दरम्यान अध्यक्ष बनण्याच्या मुद्यावर स्वत: शुक्ला हे तोंड उघडायला तयार नाहीत.
(वृत्तसंस्था)