दीर्घकाळ अव्वल स्थान टिकविणे सोपे नाही : सायना

By admin | Published: April 17, 2015 11:54 PM2015-04-17T23:54:27+5:302015-04-17T23:54:27+5:30

आत्मविश्वासाच्या बळावर अधिकाधिक काळ आपण हे स्थान टिकविण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करणार असल्याचे बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल हिचे मत आहे.

It's not easy to stay in top place for long: Saina | दीर्घकाळ अव्वल स्थान टिकविणे सोपे नाही : सायना

दीर्घकाळ अव्वल स्थान टिकविणे सोपे नाही : सायना

Next

बंगळुरू : विश्वक्रमवारीत अव्वल स्थानावर दीर्घकाळ विराजमान राहणे कठीण आहे; पण आत्मविश्वासाच्या बळावर अधिकाधिक काळ आपण हे स्थान टिकविण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करणार असल्याचे बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल हिचे मत आहे.
नंबर वन स्थान काबीज करणे सोपे नाही, असे सांगून सायना म्हणाली, ‘‘या पदावर विराजमान होणारी मी पहिली भारतीय खेळाडू आहे, हे चाहत्यांनी समजून घ्यावे. मी चांगला सराव करीत राहिले, तर दीर्घकाळ हे स्थान माझयाकडे राहू शकते. देशासाठी जास्तीत जास्त जेतीपदे जिंकण्याचा प्रयत्न राहील.’’
अव्वल स्थानाच्या शर्यतीत कोणत्या खेळाडूकडून आव्हान मिळू शकते, असे विचारताच सायना म्हणाली, ‘‘चीनची ली शुरुई ही माझी कडवी प्रतिस्पर्धी आहे. माझ्यासाठी सर्वच खेळाडू प्रतिस्पर्धी आहेत. मी कोणाएकाचे नाव घेणार नाही; पण शुरुई निकटची प्रतिस्पर्धी असेल. तिच्याकडे कमी स्पर्धा असल्याने ती पुन्हा अव्वल स्थानावर येऊ शकते.’’
अव्वल स्थान पटकावल्यानंतर माजी कोच पुलेला गोपीचंद यांचा फोन आला का, असे विचारताच ती म्हणाली, ‘‘स्पर्धेव्यतिरिक्त आमच्यात कुठलीही चर्चा होत नाही. आम्ही सरावावर फोकस करीत असल्याने स्पर्धा वगळता कशावरही चर्चा करीत नाही. इतकी वर्षे कोच राहिल्याने त्यांनी मला अनेक चांगल्या गोष्टी शिकविल्या. वेगळा सराव करीत असल्याने मतभेद होतात; पण ते आपले काम करीत आहेत, मी आपल्या सरावात व्यस्त आहे.’’
सायनाने सध्याच्या यशाचे श्रेय बंगळुरु येथील कोच विमलकुमार यांना दिले. ती म्हणाली, ‘‘विमलसरांमुळे मला सकारात्मक निकाल मिळाले. अव्वल स्थानावर पोहोचेन याबद्दल खात्री नव्हती; पण त्यांनी विजयाची भूक निर्माण केली. सतत जिंकत राहशील तर रँकिंग आपोआप सुधारेल, असे ते सांगायचे.’’
पद्म पुरस्काराच्या सर्व अटी पूर्ण केल्यानंतरही आपल्या नावाचा विचार करण्यात आला नाही, याबद्दल खेद नसल्याचे सायनाने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. ती म्हणाली, की काही चुकीचे होत आहे असे त्या वेळी वाटल्याने मी प्रतिक्रिया दिली होती; पण पुरस्कार न मिळाल्याची खंत नाही. पुढच्या वर्षीच्या पद्म पुरस्काराबद्दल विचारताच ती म्हणाली, ‘‘याचा निर्णय सरकारला घ्यायचा आहे. अनेकदा खेळाडू बोलताना भावुक होतात. मला कुठल्याही गोष्टीचा पश्चात्ताप नाही. वारंवार भाष्य करणे योग्य नाही. सरकार खेळाडूंच्या पाठीशी असल्याने आम्ही भविष्याकडे लक्ष देत आहोत.’’ (वृत्तसंस्था)

...म्हणून गोपी सरांना सोडले
गोपीचंदसोबत मतभेद होण्याचे कारण काय, या प्रश्नाच्या उत्तरात सायनाने सांगितले, की कोर्टवर खेळल्यानंतर जे डावपेच आखले जात होते, ते सामन्यादरम्यान कुचकामी ठरत असल्याने मी सर्वोत्कष्ट खेळाडूंकडून
पराभूत होत असे. मी हे ध्यानात आणून दिले; पण काहीही लाभ होत नव्हता. माझ्या खेळाला वेगळे डावपेच हवे होते. प्रत्येक कोच खेळातील बारकावे समजून घेईल, असे नाही. अनेकदा एका स्तरावरून दुसऱ्या स्तरावर सुधारणा कशी करायची, हे कोचला समजत नाही. नेमक्या याच कारणास्तव मी विभक्त झाले.’

Web Title: It's not easy to stay in top place for long: Saina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.