Big News : सायना नेहवाल, किदम्बी श्रीकांत यांचे टोक्यो ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न भंगले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 04:36 PM2021-05-28T16:36:06+5:302021-05-28T16:36:21+5:30
लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेती सायना नेहवाल ( Saina Nehwal ) आणि किदम्बी श्रीकांत ( Kidambi Srikanth ) यांचे यंदा होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ( Tokyo Olympics) खेळण्याचे स्वप्न अखेर तुटले.
लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेती सायना नेहवाल ( Saina Nehwal ) आणि किदम्बी श्रीकांत ( Kidambi Srikanth ) यांचे यंदा होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ( Tokyo Olympics) खेळण्याचे स्वप्न अखेर तुटले. जागतिक बॅडमिंटन फेडरेशननं ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठीची डेडलाईन १५ जूनला संपणार असल्याचे जाहीर केले आणि या डेडलाईनपर्यंत एकही पात्रता स्पर्धा होणारी नाही. त्यामुळे सायना व श्रीकांत टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या भारतीय संघाचे सदस्य नसतील. शिवाय सध्याच्या बॅटमिंटन क्रमवारीतही कोणताच बदल होणार नसल्यानं सायना व श्रीकांतसाठीची अखेरची आशाही मावळली आहे. सिंगापूर येथे होणारी अखेरची पात्रता स्पर्धा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. ( Saina Nehwal and Kidambi Srikanth out of reckoning for Tokyo Olympics)
Invitations for #Tokyo2020 will be sent shortly with final participation lists and seedings to be published in the coming weeks.https://t.co/iTUXeCyzxl
— BWF (@bwfmedia) May 28, 2021
जागतिक बॅडमिंटन फेडरेशननं सांगितले की,''टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता मिळवण्याची डेडलाईन १५ जून २०२१ला संपत आहे. रेस टू टोक्यो रँकिंगमध्ये कोणताच बदल होणार नाही. कोरोना संकटामुळे तीन महत्त्वाच्या स्पर्धा रद्द झाल्यानंतर फेडरेशननं पात्रतेसाठी कालावधी दोन महिन्यांनी वाढवला होता.''
कोरोना व्हायरसमुळे इंडिया ओपन, मलेशिया ओपन आणि सिंगापूर ओपन या स्पर्धा रद्द झाल्या. त्यामुळे सायना व श्रीकांतचे ऑलिम्पिक पात्रता मिळवण्याचे स्वप्न भंगले. सायना क्रमवारीत २२व्या स्थानावर आहे. ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी खेळाडूंना जागतिक क्रमवारीत अव्वल १६ मध्ये असणे गरजेचे आहे. पण, आता १५ जूनपर्यंत स्पर्धाच नसल्यानं यात बदल होईल अशी शक्यता कमी आहे. त्यामुळे भारताकडून ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी व्ही सिंधू आणि साई प्रणित यांचा ऑलिम्पिक प्रवेश निश्चित झाला आहे.