‘महान खेळाडूंच्या पंक्तीत पाहणे अत्यंत आनंददायक’
By admin | Published: October 21, 2016 01:17 AM2016-10-21T01:17:16+5:302016-10-21T01:17:16+5:30
मार्टिना नवरातिलोवा, कॅरा ब्लॅक आणि लिजेल हुबेर यासारख्या महान खेळाडूंच्या पंक्तीत स्वत:ला पाहणे अत्यंत आनंदाची बाब असून त्यामुळे आणखी प्रेरणा मिळते, अशी
हैदराबाद : मार्टिना नवरातिलोवा, कॅरा ब्लॅक आणि लिजेल हुबेर यासारख्या महान खेळाडूंच्या पंक्तीत स्वत:ला पाहणे अत्यंत आनंदाची बाब असून त्यामुळे आणखी प्रेरणा मिळते, अशी प्रतिक्रिया सलग ८० आठवडे जागतिक महिला दुहेरीत अव्वल स्थानी राहिलेल्या भारताच्या सानिया मिर्झाने सांगितले.
सानियाने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, की ‘माझ्यासाठी अविश्वसनीय प्रवास राहिला असून हे एका स्वप्नासारखं आहे. माझ्या मते, कोणत्याही क्षेत्रात अव्वल स्थानी पोहोचणे नेहमी मोठे यश असते. मात्र, मोठ्या कालावधीसाठी या स्थानी कायम राहणे हे पहिल्यांदा अव्वल येण्यापेक्षा अत्यंत कठीण असते.’
महान टेनिसपटू नवरातिलोवा तब्बल १८१ सलग आठवडे अव्वल राहिली होती. तर, यानंतर ब्लॅक (१४५) आणि हुबेर (१३४) यांचा क्रमांक लागतो. २०१४मध्ये कॅरा ब्लॅकसह खेळताना सानियाचा नंबर वन प्रवास सुरू झाला. नंतर नवरातिलोवासह खेळताना सलग १४ सामने जिंकण्याचा सानियाने पराक्रम केला. (वृत्तसंस्था)
मी माझ्या कारकिर्दीत जे काही साध्य केले आहे, त्याचे एक विशिष्ट कारण सांगणे खूप कठीण होईल. मात्र, माझ्या पूर्ण संघाचे एकत्रित काम यापैकी एक नक्कीच असेल. माझ्या मते, यासारखे अनेक विक्रम अजूनही दूर असून, मी सध्या तरी माझ्या सामन्यांवर लक्ष केंद्रित करीत आहे. - सानिया मिर्झा