जडेजा प्रकरणात बीसीसीआय-आयसीसी वाद रंगण्याची शक्यता
By Admin | Published: July 25, 2014 11:01 PM2014-07-25T23:01:45+5:302014-07-25T23:01:45+5:30
रवींद्र जडेजा आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अॅन्डरसन यांच्यातील वादाच्या पाश्र्वभूमीवर जडेजावर सामना शुल्कातील 5क् टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे.
साऊथम्पटन : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अॅन्डरसन यांच्यातील वादाच्या पाश्र्वभूमीवर जडेजावर सामना शुल्कातील 5क् टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणात बीसीसीआय आणि आयसीसी यांच्यादरम्यान वाद रंगण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या निर्णयाला आव्हान देण्याचे संकेत दिले आहेत.
आयसीसी मॅच रेफरी डेव्हिड बून यांनी अॅण्डरसनसोबत मैदानावर घडलेल्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर जडेजावर सामना शुल्कातील 5क् टक्के रकमेचा दंड ठोठावला आहे; पण जडेजा केवळ लेव्हल-2 प्रकाराचा दोषी आढळला. इंग्लंड संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर हा आरोप केला होता. आयसीसीच्या निर्णयानंतर काही वेळातच बीसीसीआयने यावर नाराजी व्यक्त केली असून, याविरोधात अपील करण्याचा निर्णय राखून ठेवला आहे. बीसीसीआयने जडेजासोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. मॅच रेफरी डेव्हिड बून यांनी जडेजाचे वर्तन खिलाडूवृत्तीला शोभेसे नसल्याचे स्पष्ट करताना दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने स्पष्ट केले की, ‘बोर्डाने मॅच रेफरीच्या निर्णयाचा अभ्यास केला आहे. त्यात जडेजावर भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान नॉटिंगहॅममध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप आहे. जडेजा लेव्हल-2 मध्ये दोषी आढळला आहे. मॅच रेफरीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करीत असून, त्याविरोधात अपील करण्याचा अधिकार आहे. बीसीसीआयच्या मते या प्रकरणात जडेजाची चूक नसून बोर्डाचा त्याला पाठिंबा आहे.’ ही घटना नॉटिंगहॅममध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या उपाहाराच्या वेळी घडली. भारतीय खेळाडूंनी दावा केला की, ज्या वेळी खेळाडू ड्रेसिंग रूमकडे जात होते, त्या वेळी अॅन्डरसनने जडेजाला उद्देशून अपशब्द वापरले आणि धक्का दिला.
इंग्लंड संघ व्यवस्थापनाने यापूर्वी ही घटना महत्त्वाची नसल्याचे स्पष्ट केले होते; त्यानंतर त्यांनी जडेजाविरुद्ध तक्रार केली. (वृत्तसंस्था)
निर्णयाबाबत बोलताना बून म्हणाले, ‘संहितेच्या 6.1 नुसार जडेजाने 2.2.11 नियमाचा भंग केला आहे. उभय खेळाडूंदरम्यान वाद झाला होता आणि अशा प्रकारचे वर्तन खिलाडूवृत्तीला शोभेसे नाही. असे घडायला नको होते; पण हा लेव्हल-2 चा गुन्हा होता. त्यामुळे संहितेच्या 7.65 कलमनुसार सर्व पुरावे तपासल्यानंतर जडेजा 2.1.8 नुसार दोषी असल्याचे आढळले आहे.’