‘वनडे’त दिसणार जडेजाची फिरकी
By admin | Published: December 19, 2015 12:20 AM2015-12-19T00:20:50+5:302015-12-19T00:20:50+5:30
द. आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच आटोपलेल्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करणारा डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा याचे आॅस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात
नवी दिल्ली : द. आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच आटोपलेल्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करणारा डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा याचे आॅस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात येणाऱ्या वन डे संघात पुनरागमन निश्चित मानले जात आहे. राष्ट्रीय निवडकर्ते शनिवारी संघाची घोषणा करतील.
भारतीय संघ १२ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या या दौऱ्यात पाच वन डे आणि तीन टी-२० सामने खेळेल. संघ निवडताना अन्य तीन खेळाडूंवर देखील नजर असेल. त्यात फिट झालेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, सिनियर वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा तसेच
अनुभवी फलंदाज मुरली विजय यांचा समावेश आहे. विजय तामिळनाडूसाठी मधल्या फळीत खेळत आहे. खराब फॉर्ममध्ये असलेल्या शिखर धवनऐवजी तो डावाची सुरुवात करू शकतो.
आयसीसी टी-२० विश्वचषक डोळ्यापुढे ठेवून निवडकर्ते संघ निवड करतील. संघात १२ खेळाडू आधीच ठरले आहेत. द. आफ्रिकेविरुद्ध २३ गडी बाद करणारा तसेच १०९ धावा काढणारा जडेजा सहा महिन्यानंतर वन डे संघात परतणार आहे. त्याला आश्विनसोबत दुसरा फिरकीपटू
म्हणून अक्षर पटेलऐवजी संधी दिली जाईल. ईशांतने देखील कसोटीत भरीव कामगिरी केली. त्याला वर्षभरानंतर वन डे संघात स्थान
मिळू शकते. ईशांतला द. आफ्रिकेविरुद्ध वन डे संघात देखील स्थान मिळाले होते पण जखमेमुळे तो बाहेर पडला.
मोहम्मद शमी याच्यावर अनेकांची नजर असेल. विश्वचषकानंतर गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून घेणारा शमी विजय हजारे करंडक स्पर्धेत खेळत आहे, त्याने दोन सामन्यात तीन गडी बाद केले. आफ्रिकेविरुद्ध वन डे मालिकेत वेगवान मारा सपशेल अपयशी ठरला होता. ते पाहता उमेश यादव, भुवनेश्वर कुमार आणि मोहित शर्मा यांच्या नावाचाही विचार केला जाणार आहे. तिसरा फिरकी गोलंदाज संघात घेण्यावरून वाद होऊ शकतो. हरभजनने चार सामन्यात सहा गडी बाद केले होते.
अष्टपैलू वेगवान गोलंदाजाचा अभाव असल्याने स्टुअर्ट बिन्नी याला संधी मिळू शकते. फलंदाजी क्रम ठरलेला आहे. त्यात धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना आणि धोनी हे असतील. १६ सदस्यांचा संघ निवडण्यात आल्यास गुरकिरत मान हा अतिरिक्त फलंदाज असू शकेल. (वृत्तसंस्था)