जाधवची धमा‘केदार’ झुंज अपयशी
By admin | Published: January 23, 2017 12:22 AM2017-01-23T00:22:45+5:302017-01-23T00:22:45+5:30
अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात इंग्लंडने ५ धावांनी बाजी मारत तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात यजमान भारताचा पराभव केला.
कोलकाता : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात इंग्लंडने ५ धावांनी बाजी मारत तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात यजमान भारताचा पराभव केला. पहिले दोन सामने सहजपणे जिंकत भारताने या मालिकेवर कब्जा केला. मराठमोळ्या केदार जाधवने पहिल्या सामन्याप्रमाणे पुन्हा एकदा धमा‘केदार’ खेळी केली. परंतु, अखेरच्या षटकात तो बाद झाल्याने भारताला निसटता पराभव पत्करावा लागला.
सलग तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघांनी ३००हून अधिक धावा काढल्या. प्रथम फलंदाजी करून इंग्लंडने भारतापुढे ३२२ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची मजल ५० षटकांत ९ बाद ३१६ अशी मर्यादित राहिली. अडखळत्या सुरुवातीनंतर प्रमुख फलंदाज फारशी चमक न दाखवता बाद झाल्यानंतर केदारने पुन्हा एकदा पहिल्या सामन्याचा ‘रिप्ले’ करताना जबरदस्त फटकेबाजी करून इंग्लंडवर दबाव आणला. त्याने ७५ चेंडंूत १२ चौकार व एक षटकार ठोकून शानदार ९० धावा काढल्या. अखेरच्या षटकापर्यंत त्याने इंग्लंडला प्रचंड दबावाखाली ठेवले होते. मात्र, या षटकातील ५व्या चेंडूवर षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात ख्रिस वोक्सच्या चेंडूवर तो बाद झाला आणि सामना पूर्णपणे इंग्लंडच्या बाजूने झुकला.
धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. मालिकेत पहिल्यांदा संधी मिळालेला मुंबईकर अजिंक्य रहाणे केवळ एक धाव काढून बाद झाल्यानंतर लोकेश राहुलही (११) झटपट परतला. यामुळे भारताची ६ षटकांत २ बाद ३७ अशी अवस्था झाली. यानंतर, कर्णधार विराट कोहली (५५) आणि युवराज सिंग (४५) यांनी ६५ धावांची भागीदारी केली. स्टोक्सने कोहलीला बाद करून ही जोडी फोडली. यानंतर युवराज, महेंद्रसिंह धोनी (२५) ठराविक अंतराने बाद झाले. हार्दिक पांड्या (५६)-केदार यांनी १०४ धावांची जबरदस्त भागीदारी करून भारताच्या आशा उंचावल्या. ४६व्या षटकात पांड्याला त्रिफळाचीत केले. पांड्याने ४३ चेंडूत ४ चौकार, २ षटकारांसह आपली खेळी सजवली. यानंतर, सर्व सुत्रे आपल्याकडे घेत केदारने एकट्याने इंग्लंडला झुंजवले. परंतु, संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.
केदार जाधवचा शोध आमच्यासाठी शानदार ठरला आहे. गतवर्षी आम्ही त्याचे समर्थन केले. त्याला जास्त सामने खेळण्यास मिळाले नाहीत. मात्र, त्याने मिळालेल्या संधीचा फायदा घेतला. तो युवी आणि धोनीला वरच्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देतो आणि खेळाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करतो. केदार अमूल्य आहे. हार्दिकही स्वत:ला अष्टपैलू म्हणून सिद्ध करीत आहे. खेळपट्टी पाहूनच मला आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ही खेळपट्टीची चांगली तयारी असल्याचे जाणवले. - विराट कोहली
मी सर्व सहा चेंडू खेळण्याची योजना बनवत होतो. मला माहीत होते यात मी यशस्वी झालो असतो, तर गोलंदाज दबावाखाली आले असते. ज्या चेंडूवर मी बाद झालो त्यावर मोठा फटका मारण्याच्या स्थितीत मी नव्हतो. कारण मी स्थिर नव्हतो आणि यामुळेच बाद झालो. - केदार जाधव
या सामन्याची खेळपट्टी इंग्लंडप्रमाणे होती. नाणेफेक हरल्यानंतर तुम्हाला त्या खेळपट्टीचा सामना करावा लागतो. दवाचा सामना करण्यात खूप परिश्रम करावे लागले. जेसन रॉय, सॅम बिलिंग्स यांनी आघाडीला चांगली कामगिरी केली. गोलंदाजांनी संघाला चांगल्या स्थितीत ठेवले. मोक्याच्या वेळी बळी मिळवल्याचा फायदा झाला.
- इयॉन मॉर्गन
अखेरच्या षटकातील थरार
गोलंदाज : ख्रिस वोक्स,
१६ धावांची गरज
पहिला चेंडू : केदारने एक्स्ट्रा कव्हरमध्ये षटकार ठोकला.
दुसरा चेंडू : केदारने पुन्हा एकदा त्याच ठिकाणी चौकार मारला.
तिसरा चेंडू : निर्धाव.
चौथा चेंडू : निर्धाव.
पाचवा चेंडू : डीप पॉइंटमध्ये षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात केदार झेलबाद. सामना इंग्लंडकडे झुकला.
सहावा चेंडू : भुवनेश्वर फटका मारण्यात चुकला. इंग्लंड विजयी.
धावफलक-
इंग्लंड : जेसन रॉय त्रि. जडेजा ६५, सॅम बिलिंग्ज झे. बुमराह गो. जडेजा ३५, बेअरस्टॉ झे. जडेजा गो. पंड्या ५६, मॉर्गन झे. बुमराह गो. पंड्या ४३, बटलर झे. राहुल गो. पंड्या ११,, बेन स्टोक्स नाबाद ५७, मोईन अली झे. जडेजा गो. बुमराह २, वोक्स धावबाद कुमार/धोनी ३४, प्लंकेट धावबाद पांडे/धोनी १, अवांतर : १७ एकूण : ५० षटकांत ८ बाद ३२१. गोलंदाजी : भुवनेश्वर ८-०-५६-०, पंड्या १०-१-४९-३, बुमराह १०-१-६८-१, जडेजा १०-०-६१-२, आश्विन ९-०-६०-०, युवराज ३-०-१७-०.
भारत : अजिंक्य रहाणे त्रि. गो. विली १, लोकेश राहुल झे. बटलर गो. बॉल ११, विराट कोहली झे. बटलर गो. स्टोक्स ५५, युवराज सिंग झे. बिलिंग्ज गो. प्लंकेट ४५, महेंद्रसिंह धोनी झे. बटलर गो. बॉल २५, केदार जाधव झे. बिलिंग्ज गो. वोक्स ९०, हार्दिक पंड्या गो. स्टोक्स ५६, रवींद्र जडेजा झे. बेअरस्टो गो. वोक्स १०, रविचंद्रन आश्विन झे. वोक्स गो. स्टोक्स १, भुवनेश्वर कुमार नाबाद ०, जसप्रीत बुमराह नाबाद ०, अवांतर २२, एकूण : ५० षटकांत ९ बाद ३१६. गोलंदाजी : वोक्स १०-०-७५-२, विली २-०-८-१, बॉल १०-०-५६-२, प्लंकेट १०-०-६५-१, स्टोक्स १०-०-६३-३, अली ८-०-४१-०.