देशासाठी सरसावले विश्वनाथ, कोरोना निधीसाठी आनंदाने दिला मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 08:03 AM2021-05-12T08:03:49+5:302021-05-12T08:07:10+5:30
पाचवेळा विश्वचॅम्पियनचा खिताब मिळवलेल्या विश्वनाथ यांनी भारतीयांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. कोरोना संकटात मदतीनिधी उभारण्यासाठी ऑनलाईन बुद्धीबळ खेळणार आहेत
नवी दिल्ली - देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटीमुळे हाहाकार माजला असून जगभरातून भारतातासाठी मदत मिळत आहे. जगभरात पसरलेले भारतीय देशावरील संकट घालवण्यासाठी योगदान देत आहेत. तर, भारतात बिझनेस करणाऱ्या कंपन्याही पुढाकार घेत आहेत. नुकतेच, ट्विटरने भारताच्या मदतीसाठी 110 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. तर, दुसरीकडे आयपीएल खेळणारे खेळाडूही कोरोना संकटात धावून आल्याचे दिसले. आता, जगविख्यात बुद्धीबळ चॅम्पियन विश्वनाथ आनंद हेही कोरोना मदतीसाठी फंड उभारणार आहेत.
पाचवेळा विश्वचॅम्पियनचा खिताब मिळवलेल्या विश्वनाथ यांनी भारतीयांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. कोरोना संकटात मदतीनिधी उभारण्यासाठी ऑनलाईन बुद्धीबळ खेळणार आहेत. दुसऱ्या जगविख्यात स्पर्धकांसमवेत ते सामना खेळणार आहेत. चेज डॉट कॉम ब्लिट्जधारक किंवा 2 हजारांपेक्षा कमी फिडे रेटींगवाले खेळाडू 150 डॉलर दान देऊन आनंद यांच्यासमवेत सामना खेळू शकणार आहेत. तर, इतर ग्रॅँडमास्टर्ससोबत खेळण्यासाठी 25 डॉलर द्यावे लागणार आहेत. सायंकाळी 7.30 वाजता हे सामने चेस डॉट कॉमवर प्रसारीत केले जातील, असे वेबसाईटने सांगितले.
बुद्धीबळाच्या या सामन्यात आनंद यांच्यासमवेत कोनेरू हम्पी, डि हरिका, निहाल सरीन आणि पी. रमेशबाबू हे दिग्गज खेळाडू भाग घेणार आहेत. या सामन्यातून जमी होणारा संपूर्ण पैसा रेडक्रॉस इंडिया आणि भारतीय बुद्धीबळ महासंघ यांच्या चेकमेट कोविड अभियानासाठी देण्यात येणार आहे. ''सध्या देशात कोरोना महामारीचं संकट असून प्रत्येकाला या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. असा कुणीही नाही, ज्याला या संकटाने नुकसान झाले नाही. त्यामुळे, आपण सर्वांनी कोरोना मदतनिधी दिला पाहिजे, भारतातील सर्वात श्रेष्ठ ग्रँडमास्टर्ससोबत आपण चेस खेळून देशासाठी योगदान देऊ शकता,'' असे विश्वनाथ आनंद यांनी म्हटले आहे. बुद्धीबळ महासंघातर्फे हा छोटासा प्रयत्न आहे, आपण सर्वांनी उत्फुर्तपणे यात सहभाग नोंदवावा, असे आवाहनही आनंद यांनी केलं आहे.