जयराम ‘टॉप’मध्ये
By Admin | Published: September 26, 2015 12:03 AM2015-09-26T00:03:39+5:302015-09-26T00:03:39+5:30
मागील आठवड्यात कोरिया ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपद पटकावून सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या अजय जयरामच्या रुपाने भारतासाठी पदकाचे नवे आशास्थान निर्माण झाले आहे
नवी दिल्ली : मागील आठवड्यात कोरिया ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपद पटकावून सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या अजय जयरामच्या रुपाने भारतासाठी पदकाचे नवे आशास्थान निर्माण झाले आहे. यामुळेच पुढील वर्षी होणाऱ्या रिओ ओलिम्पिकच्या तयारीसाठी त्याला पुर्ण मदत मिळवून देण्यासाठी भारतीय बॅडमिंटन संघटनेने (बाई) अजयचा समावेश टारगेट आॅलिम्पिक पोडियम (टॉप) योजनेत करण्याचा विचार केला आहे.
दुखापतीमुळे तब्बल एक वर्षांहून अधिक काळानंतर पुनरागमन करताना थेट कोरिया ओपनचे उपविजेतेपद पटकावून त्याने गुरुवारी जागतिक बॅडमिंटन संघटनेच्या ताज्या क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल २५ क्रमांकावर झेप घेतली.
बाईचे अध्यक्ष डॉ. अखिलेश दास गुप्ता यांनी याबाबत सांगितले की, जयरामची ही चमकदार कामगिरी
आहे. तांत्रिक समितीला त्याचे प्रोफाइल तयार करण्यास आम्ही सांगितले असून त्याचा समावेश
टॉप योजनेत करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.
विशेष म्हणजे याआधी २०१२ लंडन आॅलिम्पिकमध्ये प्रवेश करण्याच्या उंबरठ्यावर जयराम होता. मात्र मोक्याच्यावेळी पारुपल्ली कश्यपने त्याला पिछाडीवर टाकून बाजी मारली. रिओ आॅलिम्पिक पात्रतासाठी शेवटची तारिख ५ मे २०१६ असून आतापर्यंत पुरुष एकेरीमध्ये किदांबी श्रीकांत, पी. कश्यप आणि एचएस प्रणय रिओ आॅलिम्पिक पात्रतेच्या शर्यतीमध्ये आहेत. (वृत्तसंस्था)