मोठी बातमी! भर सामन्यात आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडूवर बेछूट गोळीबार, मैदानात खळबळ; कबड्डीपटूचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 09:34 PM2022-03-14T21:34:49+5:302022-03-14T21:34:49+5:30

पंजाबच्या जालंधर येथे सोमवारी संध्याकाळी एका कबड्डीपटूची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे.

jalandhar international kabaddi player sandeep nangal ambiya shot at kabaddi tournament | मोठी बातमी! भर सामन्यात आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडूवर बेछूट गोळीबार, मैदानात खळबळ; कबड्डीपटूचा मृत्यू

मोठी बातमी! भर सामन्यात आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडूवर बेछूट गोळीबार, मैदानात खळबळ; कबड्डीपटूचा मृत्यू

Next

पंजाबच्या जालंधर येथे सोमवारी संध्याकाळी एका कबड्डीपटूची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. एका कबड्डी टुर्नामेंटवेळी अज्ञातांनी कबड्डीपटूवर गोळ्या झाडल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप नंगल अंबिया याला गोळी लागल्यानंतर मैदानात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात पोलीस दलही घटनास्थळी पोहोचले आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी स्टेडियममध्ये खेळविण्यात येत असलेल्या एका कबड्डी स्पर्धेत अचानक अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात कबड्डी टीममध्ये सामील असलेला खेळाडू संदीप नंगर अंबिया याच्यावर सर्व गोळ्या झाडण्यात आल्याचं लक्षात आलं. हे पाहून प्रेक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली. नेमकं काय घडलंय हे कुणाच्या लक्षात येताच गोळीबार करणारे घटनास्थळाहून मोटारसायकलवरुन पळाले. 

घटनास्थळावर उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीनं संदीप नंगर अंबिया याला कारमध्ये टाकून रुग्णालयात नेलं. पण मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यानं संदीपचा रस्त्यातच मृत्यू झाला आहे. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी आणि रुग्णालयात पोहोचले आहे. परिसरातील परिस्थिती बिघडू नये, यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी उपस्थित लोकांची चौकशी करून गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे. याशिवाय मारल्या गेलेल्या खेळाडूचे कोणाशीही व्यवहार किंवा अन्य कारणावरून शत्रुत्व होते का, हेही पोलीस जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असून हत्येशी संबंधित सर्व पैलूंवर तपास सुरू करण्यात आला आहे.

Web Title: jalandhar international kabaddi player sandeep nangal ambiya shot at kabaddi tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.