जंबोचा कोहलीवर विराट आरोप
By admin | Published: June 21, 2017 07:11 AM2017-06-21T07:11:20+5:302017-06-21T07:11:20+5:30
कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील कथित वाद प्रकरणामुळे भारतीय क्रिकेटविश्व ढवळून निघाले.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील कथित वाद प्रकरणामुळे भारतीय क्रिकेटविश्व ढवळून निघाले. त्यानंतर कुंबळेने आपल्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. पद सोडताना कुंबळेंनी कर्णधार विराट कोहलीच्या वर्तनावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. भारतीय संघाच्या कर्णधाराला माझ्या प्रशिक्षकपदावर आक्षेप असल्याचा आरोप त्यांनी पायउतार होताना केला आहे. फेसबुक आणि ट्विटरवर एक पोस्ट करत जंबोन आपली नाराजी व्यक्त केली आहे.
आपल्या पोस्टमध्ये जंबो म्हणतो, गेलं वर्षभर मी टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून यशस्वी होण्याचं श्रेय कर्णधार, संपूर्ण संघ आणि सपोर्ट स्टाफला देतो. माझ्या प्रशिक्षणाच्या स्टाईलवर आणि मी मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहण्यावर कर्णधाराचा आक्षेप असल्याचं काल पहिल्यांदाच मला बीसीसीआयकडून समजलं. मी कायमच कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्या सीमा ओळखून काम करत असल्याने मला धक्का बसला आहे.
कुंबळेंनी पुढे म्हटले, बीसीसीआयने आमच्यातील मतभेद आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला, मात्र मला असं वाटतं की आता हे पद सोडण्याची वेळ आली आहे. प्रशिक्षकपदाची धुरा बीसीसीआय ज्या व्यक्तीला पात्र समजेल, त्याच्याकडे सुपूर्द करण्याची मी विनंती करतो.
कुंबळेची यशस्वी कारकीर्द
५ कसोटी मालिका जिंकल्या.
आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये अव्वल स्थान पटकावले.
घरच्या मैदानावर १३ पैकी १० कसोटी सामने जिंकले.
वेस्ट इंडिजमध्ये कसोटी मालिका जिंकली.
Thank you! pic.twitter.com/eF5qVzdBRj
— Anil Kumble (@anilkumble1074) June 20, 2017