आशियाई चॅम्पियन चषक हॉकी: उपांत्य फेरी गाठणाऱ्या भारतापुढे जपानचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 09:19 AM2021-12-19T09:19:36+5:302021-12-19T09:20:11+5:30
आशियाई चॅम्पियन चषक हॉकी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणाऱ्या भारताला अखेरच्या साखळी सामन्यात आज जपान विरुद्ध दोन हात करावे लागणार आहे.
ढाका : आशियाई चॅम्पियन चषक हॉकी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणाऱ्या भारताला अखेरच्या साखळी सामन्यात आज जपान विरुद्ध दोन हात करावे लागणार आहे. या सामन्यात विजय प्राप्त करून उपांत्य फेरीला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा भारताचा प्रयत्न असेल. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारताची या स्पर्धेतील सुरुवात अपेक्षेनुरुप झाली नाही.
पहिल्याच सामन्यात कोरियाने गतविजेत्या भारताला २-२ ने बरोबरीत रोखले होते. मात्र, यानंतर भारतीय संघाने जोरदार मुसंडी मारत यजमान बांगलादेशचा ९-० ने धुवा उडवला होता. त्यानंतच्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ३-१ ने धक्का देत उपांत्य फेरीचे तिकीट मिळविले. सध्या भारत तीन सामन्यांत ७ गुण मिळवत अव्वल स्थानावर आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांवर नजर टाकल्यास जागतिक क्रमवारी आणि सध्याचा खेळाचा दर्जा बघता भारत या सर्व संघांपेक्षा कितीतरी समोर आहे.
सुरुवातीच्या सामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागल्याने भारतीय संघ त्यातून सतर्क झाला. म्हणूनच त्यानंतर सलग दोन सामन्यांत भारताने मोठे विजय मिळविले. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कडव्या प्रतिकाराची भारताला अपेक्षा होती. शेवटच्या दोन क्वॉटरमध्ये ती खरी ठरली. कारण पाकिस्तानने चांगला खेळ दाखवत भारतावर दबाव वाढवला होता. खासकरून शेवटच्या १५ मिनिटांत, तर त्यांनी भारतीय गोलपोस्टवर अनेक हल्ले केले होते. मात्र, भारताच्या भक्कम बचावापुढे त्यांचा निभाव लागू शकला नाही. आतापर्यंत या स्पर्धेत भारताकडून ललित उपाध्याय, आकाशदीप सिंग आणि दिलप्रीत सिंग यांनी चमकदार कामगिरी केलेली आहे. तर कर्णधार मनप्रीत आणि बचावपटू हरमनप्रीत यांनी आपल्या दर्जेदार खेळाने सर्वांना प्रभावित केले. पी. आर. श्रीजेशच्या अनुपस्थित भारतीय गोलकिपरची जागा उत्तमरीत्या सांभाळण्यात सूरज करकेरा यशस्वी ठरला आहे.
विशेष करून पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तर त्याने आपल्या भक्कम बचावाचा नमुना पेश करत भारताला विजयी करण्यात मोलाची भूमिका बजावली. गेल्या काही वर्षांतली आकेडीवारी बघितल्यास आजच्या सामन्यात भारताची विजयाची शक्यता जास्त आहे. टोकीयो ऑलिम्पिकमध्ये जापानविरुद्धचा सामना भारताने ५-३ ने जिंकला होता.