जपान उपांत्यपूर्व फेरीत
By admin | Published: June 24, 2015 11:31 PM2015-06-24T23:31:13+5:302015-06-24T23:31:13+5:30
महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गतविजेत्या जपानने नेदरलँडला २-१ नी पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. साओरी अरियोशी व मिजुहो साकागुची यांनी
वैंकुवर : महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गतविजेत्या जपानने नेदरलँडला २-१ नी पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
साओरी अरियोशी व मिजुहो साकागुची यांनी गोल करून संघाला विजय मिळवून दिला. आता येत्या शनिवारी जपानची लढत एडमंटमध्ये आॅस्ट्रेलियाशी होईल.
जपानने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व मिळविले. सामन्याच्या दहाव्या मिनिटाला अरियोशी हिने गोल करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. जपानने जोरदार आक्रमण करून आपली भूमिका स्पष्ट केली. मध्यंतराला जपानने गोल करण्याच्या काही संधी दवडल्या. सामन्याच्या २२व्या मिनिटाला सामेशिमा हिने गोलपोस्टच्या जवळून मारलेला चेंडू गोलजाळ्यावरून गेला.
मध्यंतरापूर्वी शिनोबू आन्हो हिनेदेखील गोल करण्याची चांगली संधी निर्माण केली होती. मात्र, त्या संधीचे गोलमध्ये रूपांतर होऊ शकले नाही. उत्तरार्धात ६७व्या मिनिटाला सकागुची हिनेदेखील आक्रमण करून गोलची संधी निर्माण केली. मात्र, नेदरलँडच्या गोलरक्षकाने ही संधी विफल केली.
त्यानंतर सामन्याच्या ७८व्या मिनिटाला मिडफिल्डर सकागुची हिने गोल करून संघाची आघाडी २-०ने वाढविली. सामन्याच्या ७६व्या मिनिटाला नेदरलँडने जपानच्या गोलजाळ्याच्या दिशेने आक्रमण करून मुसंडी मारली. मात्र, गोलरक्षक अयुमी काइहोरी हिने वान डि वेन हिने मारलेला चेंडू अडवून गोल करण्याची संधी हाणून पाडली. त्यानंतर वान डि वेन हिनेच इंज्युरी टाइममध्ये गोल करून संघाची आघाडी १-२ अशी कमी केली. मात्र, तोपर्यंत सामना नेदरलँडच्या हातून निसटून गेला होता.
येत्या शनिवारी जपानला उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविण्यासाठी आॅस्ट्रेलियाशी झुंजावे लागेल. त्यापूर्वी शुक्रवारी मँट्रीयल
येथे जागतिक क्रमवारीत अव्वल
स्थानी असलेल्या जर्मनी व तिसऱ्या स्थानी असलेल्या फ्रान्स संघांत लढत होईल. तर, ओटावामध्ये चीनची
लढत आॅलिम्पिकविजेत्या अमेरिका संघाशी होणार आहे. शनिवारी
यजमान कॅनडा व इंग्लंडची लढत वैंकुवरमध्ये होईल.