ऑलिम्पिक हॉटेलमध्ये सात जण पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 09:23 AM2021-07-15T09:23:27+5:302021-07-15T09:24:21+5:30
बायोबबल फुटला: आयोजनाला मोठा धक्का.
टोकियो : ऑलिम्पिकसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांचे निवासस्थान असलेल्या हॉटेलमधील बायोबबल स्पर्धा सुरू होण्याआधीच फुटला. या हॉटेलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने स्टाफमधील सात जण बुधवारी पॉझिटिव्ह आढळले. २३ जुलैपासून सुरू होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ऐतिहासिक आयोजन संबोधले असले तरी‘ ज्याची भीती होती तेच घडल्याने ’खळबळ माजली आहे.
शहराच्या नैऋत्येकडे असलेल्या हामामत्सु भागात हे हॉटेल स्थित आहे. या ठिकाणी ब्राझीलचे १२ अधिकारी वास्तव्यास असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सर्व उपाय योजले जात असताना बायोबबल फुटला कसा, असा अधिकाऱ्यांना प्रश्न पडला. स्टाफच्या संपर्कात आणखी कितीजण आले होते, याबाबत माहिती मिळू शकली नाही.
स्वत:च घ्या पदक!
यंदा विजेत्यानाच कोरोनामुळे पदक स्वत:च्या गळ्यात घालावे लागेल. आयओसीने पदक वितरण सोहळ्याबाबत खुलासा केला. ‘पदक ट्रेमध्ये ठेवून विजेत्यांपुढे केले जाईल, खेळाडूंनी ते स्वत: गळ्यात घालायचे आहे. कुठल्याही पदकाला कुणाचा थेट स्पर्श झाला नसल्याची खात्री केल्यानंतरच खेळाडूकडे हे पदक जाईल,’ असे आयओसीने सांगितले.
उद्घाटन राजांच्या हस्ते
टोकियो ऑलिम्पिकचे उद्घाटन जपानचे राजे नारुहितो यांच्या हस्ते होईल, असा दावा एका वृत्तात करण्यात आला. ६१ वर्षांचे नारुहितो शाही महालात विदेशी प्रतिनिधींनाही आमंत्रित करतील. यजमान देशाचे राष्ट्राध्यक्ष ऑलिम्पिक सुरू झाल्याची घोषणा करू शकतात.